काही दिवसांपूर्वी इरफान खाननेच ट्विट करत त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली. या ट्विटमध्ये त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour झाल्याचं सांगितलं. श्री गंगाराम रुग्णालयाच्या डॉक्टर सुमित्रा रावत यांनी या ट्युमरवर कशापद्धतीने उपचार करता येऊ शकतो याबद्दल माहिती दिली. एचओडी, सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लान्टच्या डॉक्टर रावत यांनी एएनआयशी बोलतानमा सांगितले की, हा ट्युमर यशस्वीरित्या काढला जाऊ शकतो.

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरमध्ये न्यूरोएन्डोक्राइन पेशीची शरीरात असामान्यपद्धतीने वाढ होत असते. या पेशींचे प्रमाण वाढले की अशाप्रकारचा ट्युमर होण्याची शक्यता असते. हा ट्युमर फुफ्फुसं, आतडं आणि थायरॉइडद्वारे समोर येतात. हा ट्युमर कोणत्या दिशेला आहे आणि तो किती मोठा आहे यावरुन रुग्णाची समस्या किती गंभीर आहे याचे निदान करता येऊ शकते.

शस्त्रक्रिया करुन हा ट्युमर काढला जाऊ शकतो. पण उपचारादरम्यान आणि त्यानंतरही रुग्णाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. लाखोंमध्ये एकालाच हा ट्युमर होतो. पण शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला चेक-अपसाठी नित्यनियमाने रुग्णालयात जावे लागते. आयुष्याकडून आपल्या अपेक्षांप्रमाणेच सर्व गोष्टी मिळतातच असं नाही, अशा आशयाची मार्गारेट मिशेल यांची ओळ लिहित त्याने आपल्या आजाराविषयीची माहिती दिली होती.

आयुष्यात अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अगदी अशाच काहीशा परिस्थितीचा मी गेले काही दिवसांपासून सामना करत आहे. मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचं समजलं. सध्या ही परिस्थिती कठिण आहे. पण, माझ्या सोबत असणारं इतरांचं प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारा धीर पाहता मला आशेचा किरण दिसतो आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावं लागतंय. पण, तरीही मी सर्वांनाच विनंती करतो की, माझ्यावर तुमचं प्रेम असच कायम राहू द्या. असं तो म्हणाला.