मनोरंजन क्षेत्रात सध्या ऑस्कर पुरस्कारांचे वारे वाहात आहेत. शेकडो चित्रपट ऑस्कर स्पर्धेसाठी नामांकन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातून रणवीर सिंगच्या गल्ली बॉयने ऑस्करपर्यंतची मजल मारली. दरम्यान आणखी एक चित्रपट या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या चित्रपटाचे नाव ‘मोती बाग’ असे आहे. ऑल इंडीया रेडिओने ट्विटच्या माध्यमातून ‘मोती बाग’ ऑस्करसाठी नामांकीत झाल्याची माहिती दिली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट या गटात नामांकन मिळाले आहे. ६० मिनिटांच्या या माहितीपटाचे दिग्दर्शन निर्मल चंदर दांद्रियाल यांनी केले आहे.

एका ८३ वर्षीय शेतकऱ्याची गोष्ट ‘मोती बाग’मध्ये दाखवण्यात आली आहे. हा सामान्य शेतकरी अथक परिश्रम करुन आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. दरम्यान त्याला सोसाव्या लागणाऱ्या नैसर्गीक आपत्ती व उदासिन प्रशासन यांचे चित्रण या माहितीपटात केले गेले आहे. हा माहितीपट वर्षभरात प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांप्रमाणे मसालेदार नाही. तसेच यांत कोणतेही सुपरस्टार कलाकार नाहीत. या माहितीपटाची जोरदार जाहिरातही केली गेली नाही. परंतु तरीही या माहितीपटाने ऑस्करपर्यंतची मारलेली मजल नक्कीच अभिमानास्पद आहे.

“मोती बाग या माहितीपटातील शेतकरी भारतातील सामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र या देशात शेतकऱ्याला महत्व नाही. त्यांच्या समस्यांकडे प्रशासन गांभिर्याने पाहात नाही. भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कळाव्यात यासाठी या माहितीपटाची मी निर्मिती केली. आणि आता ऑस्करच्या निमित्ताने या समस्यांवर नक्कीच चर्चा केली जाईल अशी मला अपेक्षा आहे.” अशी भावना चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मल चंदर दांद्रियाल यांनी व्यक्त केली.