News Flash

कथा पडद्यामागचीः रंगभूमी हीच आई आणि पहिलं प्रेम- मयुरेश पेम

इथे कालच्या पुण्याईवर आज जगता येत नाही

मयुरेश पेम

रंगभूमी म्हणजे एक वेगळंच जग आहे. रंगभूमीची झिंग एकदा का चढली की ती आजन्म त्या व्यक्तीसोबतच असते. रंगभूमीच्या जगात तुम्ही विविध अनुभव घेत समृद्ध होत असता. अशा या रंगभूमीविषयीचे कलाकारांचे अनुभव आपण या सदरातून अनुभवले. आतापर्यंत अनेकांनी आपल्या कष्टाने आणि एकनिष्ठेने मराठी रंगभूमी गाजवली. जेवढं नितातं प्रेम कलाकारांनी या रंगभूमीवर केलं, तेवढंच प्रेम रंगभूमीनेही त्यांना दिलं. गेली अनेक वर्ष मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता मयुरेश पेम याने त्याचे काही रंगभूमीवरचे अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे शेअर केले.

माझ्यासाठी रंगभूमी ही माझी आई आहे आणि पहिलं प्रेमही. मी ७ वर्षांचा होतो तेव्हा बाबांच्या तुझा आयला या एकांकीकेमध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता. त्या संपूर्ण एकांकीकेमध्ये माझा फक्त एकच संवाद होता. पण त्या संवादाचाही मी अगणितवेळा सराव केला असेन. आजही ती एकांकीका आणि तो संवाद मला लख्ख लक्षात आहे. रंगभूमीमुळे तुमचा अभिनयाचा पाया भक्कम होतो. आजही मला अनेक मेसेज येतात ज्यात तरुणांना सिनेमात किंवा मालिकांमध्ये काम करायचं असतं. नाटकाची ओढ फारशी त्यांच्यामध्ये दिसतच नाही. पण नाटक नाही तर तुम्ही या क्षेत्रात प्रदीर्घ वाटचाल करु शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे.

अनेकांना कलाकारांचं स्टारडम, फेम दिसतं पण त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसत नाही. पण यातही काही असे आहेत जे स्वतःवर काम करतात आणि प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल याकडे बघतात. स्वतःला कालच्यापेक्षा आज चांगलं बनवायचं असेल तर रंगभूमीशिवाय पर्याय नाही. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. इथे कालच्या पुण्याईवर आज जगता येत नाही. एखादा प्रयोग हाऊसफुल्ल झाला म्हणून त्यानंतरचा प्रयोग कसा तरी केला असं कधीच होत नाही. प्रत्येक प्रयोगाला तेवढीच ताकद लावली जाते. नाटकावेळी येणारे अनुभवही वेगवेगळे असतात.

आपल्याला लहानपणीच्या सर्वच आठवणी लक्षात असतात असे नाही. पण त्यातही काही आठवणी अशा असतात ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. अशीच एक अविस्मरणीय आठवण म्हणजे माझा पहिला वाढदिवस भाईदास हॉलमध्ये साजरा करण्यात आला होता. अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासूनच माझं आणि रंगभूमीचं एक अनोखं नातं तयार झालं होतं. जे आजतागायत टिकून आहे आणि मी असेपर्यंत ते टिकून राहावं हीच इच्छा आहे.

एकांकीका करतानाही अनेक अनुभव येत असतात. मुळात एकांकीका या ३० मिनिटांच्या असतात. त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते ठरलेल्या वेळेत सांगायचे असते. आमची एकांकीका सुरु होती. माझ्या सहकाऱ्याने अचानक १० मिनिटांचा एक भाग गाळला आणि त्याचा शेवटचा संवाद घेतला. आता ३० मिनिटांच्या एकांकीकेमध्ये जर १० मिनिटांचा भाग गाळला गेला तर त्यात सांगण्यासारखं काय राहणार? पण तेव्हा आम्ही काहीच करु शकत नव्हतो. त्याच्या संवादानंतर माझी एक्सिट होती. ठरल्याप्रमाणे मी ती घेतलीही, पण पुढे काय या विचाराने मी खूप घाबरलो होतो.

विंगेत गेल्यावर मी खालीच बसलो आणि रंगभूमीच्या पाया पडलो. यातून बाहेर काढ अशी विनंती केली आणि पुन्हा माझ्या एण्ट्रीला मी तो १० मिनिटांचा भाग संवादातून भरुन काढत एकांकीका जशी सुरू व्हायला हवी तशी सुरू झाली आणि संपलीही. ती एकांकीका आणि तेव्हाची माझी मनःस्थिती मी आजही विसरू शकत नाही.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:20 am

Web Title: exclusive katha padyamagchi actor mayuresh pem talks about his experience in drama
Next Stories
1 शब्दांच्या पलीकडले : आजा सनम मधुर चांदनी में हम
2 VIDEO : कंदील बलोचच्या बायोपिकचा टिझर वेगळच सत्य उघड करतोय
3 … म्हणून रणबीरने मागितली गोविंदाची माफी
Just Now!
X