करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटांसंदर्भातल्या काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. तसेच काही विशेष सवलती देण्याचीही विनंती केली आहे.

चित्रपटासंदर्भातील काही संघटना जसं की IMPPA, IFTDA, FWICE, CINTAA यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या मागण्या केल्या आहेत. प्रशासनाच्या नव्या निर्बंधांनुसार, चित्रीकरण आणि त्यानंतरच्या सर्व प्रक्रियेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात या संघटनांनी बंदिस्त जागेतल्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी देण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन चित्रीकऱणानंतरचा काम पूर्ण होऊन कार्यक्रम अथवा चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्ण होतील.

त्याचसोबत सेट बांधण्याच्या कामाला परवानगी देण्याची विनंतीही केली आहे जेणेकरुन निर्मात्यांचे नुकसान टळेल. त्यांनी असंही सांगितलं आहे की जे लोक सेट बांधकामामध्ये सहभागी असतील ते सेटवरच राहतील आणि सर्व निर्बंधांचं पालन करतील. त्याचबरोबर त्यांनी रोजंदारीवरील कामगारांना, कलाकारांना आणि तंत्रज्ञांना अर्थसाहाय्य करण्याबाबतही सुचवलं आहे.

त्याचसोबत फिल्मसिटीच्या भागात लसीकरण केंद्रं उभारण्याची विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

करोना प्रतिबंधासाठी घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. अनेक मालिकांचंही चित्रीकरण यामुळे बंद झालं आहे.