19 January 2021

News Flash

फेस्टिव्हलमध्ये महिलाराज…

चित्रपट हा बहुतांश भारतीय प्रेक्षकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अलीकडे विविध फिल्म फेस्टिव्हल होतात. त्यात काहीतरी नावीन्य आणलं तर प्रेक्षक त्याकडे जरूर वळतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे; फ्लो फिल्म फेस्टिव्हल. या फेस्टिव्हलमध्ये महिलांवर आधारित सिनेमे दाखवले गेले.

चित्रपट हा बहुतांश भारतीय प्रेक्षकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यातले काही जण कदाचित भारतीय चित्रपटांपेक्षा परदेशी चित्रपटांना अधिक महत्त्व देणारे असतीलही, पण ते चित्रपटापासून दूर आहेत असं नाही. त्यामुळे चित्रपट हे माध्यम प्रेक्षकांच्या अतिशय जवळचं आहे. हे अधोरेखित करणारं चित्र म्हणजे ठिकठिकाणी होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणारी गर्दी. आवड म्हणून सिनेमा बघण्यासाठी वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. प्रत्येक फेस्टिव्हलचा उद्देश, विषय वेगवेगळा असतो. विषयापेक्षा प्रेक्षकांना चित्रपट केव्हाही महत्त्वाचाच वाटतो. पण असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन फेडरेशन ऑफ इंडिअन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री म्हणजे फिकी (FICCI) या असोसिएशनने फ्लो (FLO) फिल्म फेस्टिव्हल म्हणजे फिकी लेडीज ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता. महिला सक्षमीकरणावर आधारित जगातील विविध भाषांतील सिनेमे असा या फेस्टिव्हलचा विषय होता. तीन दिवस रंगलेल्या या फेस्टिव्हलला दर्दी प्रेक्षकांची चांगलीच गर्दी झाली होती. फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे गव्हर्नर विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री सोनम कपूर हे प्रमुख पाहुणे होते.

मुंबईच्या फिल्म डिव्हिजन इमारतीत रंगलेल्या या फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष होतं. पहिलं वर्ष असूनही फेस्टिव्हलला प्रेक्षकांची विशेषत: महिला प्रेक्षकवर्गाची मोठी संख्या दिसून आली. महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळावी, त्यांचे प्रश्न अधोरेखित व्हावे, संकटांना धाडसाने उत्तर कसं द्यावं हे सगळं सांगणारा, पटवून देणारा उद्देश या फेस्टिव्हलचा होता. खरं तर महिला कार्यरत नाहीत अशी क्षेत्रं फार कमी आहेत. तरी त्यातही आता महिलांनी काम करावं असा सकारात्मक संदेश या फेस्टिव्हलमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होता. उद्घाटनास आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी या फेस्टिव्हलविषयी त्यांची मते मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘लोकांना विविध विषयांबाबत माहिती देण्यासाठी चित्रपटांचा वापर व्हायला हवा. जगातील विशेषत: भारतातली लोक सिनेमांवर प्रंचंड प्रेम करतात. सिनेमांची स्वप्नं बघतात. सिनेमात घडणाऱ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य प्रभावित होत असतं. चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित असतात असं म्हटलं तरी पुष्कळ सिनेमे हे समाजाचं प्रतिबिंब अधोरेखित करत असतात.’’ फेस्टिव्हलचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी सरकारकडून भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये फिकी या असोसिएशनला सहभागी करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाच्या व्यग्र वेळापत्रकातून मुख्यमंत्र्यांनी फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. महाराष्ट्राचे गव्हर्नर विद्यासागर राव हेदेखील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनीही या फेस्टिव्हलच्या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांचे काही प्रश्न उपस्थित करत त्यावर काही उपायही सुचवले.

उद्घाटन सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे सोनम कपूर. फॅशनिस्ता सोनम तिच्या ‘नीरजा’ या सिनेमाविषयी बोलली. ती साकारत असलेली नीरजा ही व्यक्तिरेखा कणखर, धाडसी अशी असल्यामुळे तो सिनेमाही महिला सक्षमीकरणाचंच एक उदाहरण आहे. सोनम म्हणाली, ‘‘नीरजा अतिशय कणखर, धाडसी मुलगी होती. आयुष्यात अचानक येणाऱ्या संकटाना सामोरं जाण्यासाठी सज्ज होती. हीच वैशिष्टय़े आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेकींमध्ये दिसतात. त्या स्वत: खूप धाडसी असतात. स्वत:ला अधिकाधिक सक्षम करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. ग्रामीण, छोटय़ा शहरातील अशा सर्वच भागातील स्त्रिया या खऱ्या अर्थाने ‘हिरो’ आहेत.’ सिनेमांतील महिला व्यक्तिरेखांबाबत बोलताना ‘मी स्त्रीवादी आहे’ असंही तिने बिनधास्त कबूल केलं.

उद्घाटनानंतर उत्सुकता होती ती फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांविषयी. भारतासह हाँगकाँग, श्रीलंका, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, इंडोनेशिया, इराण, बांग्लादेश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा अनेक देशांमधल्या चित्रपट, डॉक्युमेंटरी, लघुचित्रपट यांचा समावेश होता. महिला, त्यांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण अशा महिलाकेंद्रित विषयांवरील सिनेमांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होता. ‘शी ऑब्जेक्ट्स’, ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’, ‘फातिमा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘मिशन रेप-अ टूल ऑफ वॉर’, ‘ड्रायव्हिंग विथ सेल्वी’, ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’, ‘सिती’, ‘स्वयम’ अशा अनेक वेगळ्या धाटणींच्या कलाकृतींची यात निवड केली होती.

एखाद्या फेस्टिव्हलमध्ये विविध विषयांवरील सिनेमे दाखवले जातात. त्यामुळे त्यातलं वैविध्य प्रेक्षकांना अनुभवता येतं. फ्लो फिल्म फेस्टिव्हलमध्ये मात्र सगळेच सिनेमे हे स्त्रीकेंद्रित होते. त्यामुळे अशा सिनेमांना कसा प्रतिसाद मिळेल ही शंका होती. पण ही शंका खोटी ठरली. इतर फेस्टिव्हलप्रमाणेच याही फेस्टिव्हलला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. केवळ प्रतिसादच नाही तर प्रेक्षकांमध्ये त्याबाबत चर्चा होत होती. आपापली मतं व्यक्त केली जात होती. फेस्टिव्हलमध्ये असलेले सिनेमे केवळ महिलांचे प्रश्न मांडत नाहीत तर त्यावर मात करून पुढे गेलेल्या महिलांना सलामही करतात. तसंच स्त्रियांचं भावविश्व, त्यांच्या मनात चाललेली विचारांची उलथापालथ, त्यांच्या आवडीनिवडी, विविध वयाच्या टप्प्यावरील त्यांची मन:स्थिती असं सगळं या सिनेमांमधून रेखाटलं गेलंय.

बलात्कार हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा गंभीर विषय आहे. हाच विषय जवळपास विसेक वर्षांपूर्वी बोसनिया देशात भयानक प्रश्न बनला होता. आंतरराष्ट्रीय सशस्त्र संघर्षांतून सुरू झालेलं युद्ध बोसनियामध्ये जवळपास तीन ते चार र्वष सुरू होतं. या युद्धात महिलांचे सगळ्यात जास्त बळी जात होते. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्याच्या अनेक घटना घडल्या. काही वेळा बलात्कार करून त्यांना मारून गायब करण्यात आलं. बोसनियामधल्या या गंभीर विषयावर तयार केलेली ‘मिशन रेप : अ टूल ऑफ वॉर’ ही डॉक्युमेंटरी सुन्न करणारी आहे. या युद्धात बळी गेलेल्या स्त्रियांची माहिती, बलात्कार झालेल्या पीडित स्त्रियांचे अनुभव, तत्कालीन परिस्थिती असं सगळंच या डॉक्युमेंटरीमध्ये आहे. एका मुलीवर बलात्कार करून तिला अशा प्रकारे मारून गायब केलं होतं की ती शोधताना तिच्या शरीराचा एकेक तुकडा तिचाच आहे का हे तपासून घ्यावं लागलं. हा प्रसंग दाखवताना प्रेक्षागृहातील प्रेक्षकांमधून स्वाभाविकच दु:ख व्यक्त केलं जात होतं.

स्त्रिया कणखर झाल्या की त्यांना हवं ते त्या मिळवू शकतात हे सांगणारी डॉक्युमेंटरी होती, ‘ड्रायव्हिंग विथ सेल्वी.’ सेल्वीचं इतर काही मुलींप्रमाणेच लवकर लग्न लावून दिलं जातं. पण ती तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी नसते. एक दिवस ती जीव देण्यासाठी पळून जाते. पण असं न करता ती जगायचं ठरवते. पुढे ती अशा पद्धतीने तिचं आयुष्य जगते की ती दक्षिण भारतातील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर बनते. तिची यशोगाथा सांगणारी ही डॉक्युमेंटरी प्रेरणादायी आहे. ‘आय अ‍ॅम अ गर्ल’, ‘कॅमेरा/वुमन’, ‘द बॉक्सिंग गर्ल्स ऑफ काबुल’, ‘टेल्स’, ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’ ‘फातिमा’ हे चित्रपट ही प्रेरणा देणारे आहेत.

‘फातिमा’ हा सिनेमा एका आईच्या मनातल्या कधीही व्यक्त न केलेल्या गोष्टी उलगडतो. फातिमाला फ्रेंच नीटसं बोलता येत नसल्यामुळे तिला तिच्या मुलींसोबत संवाद साधणं कठीण जातं. एकदा साफसफाई करताना ती पायऱ्यांवरून घसरून पडल्यामुळे ती मोठय़ा सुट्टीवर जाते. सुट्टीवर असताना ती तिच्या मुलींशी याआधी कधीही बोलली नाही अशा गोष्टी अरेबिक भाषेत लिहून काढते. खरं तर नात्यांमध्ये भाषा ही महत्त्वाची नसते. पण काही वेळा संवाद नसला की नात्यांमध्ये दुरावाही येऊ शकते. फातिमाचं तसंच झालं. फ्रेंच बोलता येत नसल्यामुळे मुलींशी होत नसलेला संवाद तिला त्रास देतोय. खरं तर तिला खूप बोलायचंय, पण ते घडत नाही. सुदैवाने किंवा दुर्दैवाने तिला मिळालेली सुट्टी ती सत्कारणी लावते. तिच्या मनात साठलेल्या गोष्टींचं दार मोकळं होतं. या सिनेमातून आईच्या रूपातील स्त्रीच्या भावभावना रेखाटल्या आहेत.

‘पोश्टर गर्ल’ हा सिनेमा प्रेक्षकांना वेगळ्या विश्वात घेऊन गेला. स्त्रीभ्रूणहत्येसारखा गंभीर विषय चित्रपटात हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला आहे. स्त्रीभ्रूणहत्येला जोड आहे शेतीची. दोन्ही विषय एकत्र हाताळून त्यावर तोडगा काढण्याचं सिनेमा सुचवतो. विनोदी शैलीने संपूर्ण चित्रपटाची मांडणी असली तरी अतिशय महत्त्वाच्या विषयाचं गांभीर्य हरवत नाही. यातली स्त्रीव्यक्तिरेखा कणखर दाखवली आहे. ती जुन्या रूढी, परंपरा मानणारी असली तरी अंधश्रद्धेने त्या पुढे नेणारी नक्कीच नाही, हे त्यात दाखवलं आहे. ‘मार्गारेट विथ अ स्ट्रॉ’, ‘स्वयम’, ‘सिती’ हे सिनेमेही स्वावलंबी, कणखर स्त्रीव्यक्तिरेखांमधून महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उत्तमरीत्या हाताळला आहे.

‘शी ऑब्जेक्ट्स’ या सिनेमाचा प्रीमिअर फ्लो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. सध्याचं तरुणाईचं आयुष्य सोशल मीडियाने अतिशय प्रभावित झालेलं असतं. ‘शी ऑब्जेक्ट्स’ हा सिनेमा तरुण मुलींवर अधिक लक्ष केंद्रित करतो. सेल्फी काढणं, फोटोत आपण बारीक कसे दिसू, पाय कसे दिसताहेत, डबल चीन दिसतेय का असे दिसण्याबद्दलचे न्यूनगंड त्यांना असतात. तसंच शारीरिक संबंधांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही त्या त्या वयात वेगळा असतो. जाहिरात, सोशल मीडिया, चित्रपट या सगळ्याचा प्रभाव त्यांच्यावर असतो. असे अनेक मुद्दे या प्रश्नांच्या गराडय़ात त्यांची मन:स्थिती सतत बदलत असते. या सगळ्याचा आढावा या सिनेमात घेतला आहे. हाँगकाँगमधील काही तरुणांशी चर्चा करून माहिती गोळा केली. ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन यांच्या साहाय्याने मिळालेल्या माहितीचा डेटा तयार केला आणि तो या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून दाखवला आहे. ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशनच्या मदतीने माहिती मांडल्यामुळे डॉक्युमेंटरीचा वेगळा प्रयोग बघता आला.

चित्रपटांचा प्रेक्षकांवर प्रभाव पडत असतो. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या घटना समाजाचंच प्रतिनिधित्व करणाऱ्या असल्या तरी त्या चित्रपटात दाखवल्यामुळे त्याचा परिणाम होत असतो. म्हणूनच चित्रपट हे माध्यम महत्त्वाचं मानलं जातं. आजवर चित्रपटातला पुरुष व्यक्तिरेखाच ‘हिरो’ असायला हवा असा समज होता. कालांतराने यात बदल होत गेला. स्त्रीकेंद्री सिनेमे येऊ लागले. समाजातही महिला  सक्षमीकरणाचे मुद्दे, प्रयत्न, मोहीम, उपक्रम सुरू झाले. याचं प्रतिबिंब सिनेमांमधून दिसू लागलं आणि स्त्रीव्यक्तिरेखा सिनेमाची ‘हिरो’ बनू लागली. याचं प्रमाण अलीकडे वाढत गेलं. संपूर्ण सिनेमा स्त्रीव्यक्तिरेखेच्या खांद्यावर सोपवण्याचं आव्हान सिनेकर्तेही घेऊ लागले. हे चित्र केवळ भारतीय सिनेमांमध्ये नाही तर इतर अनेक देशांतल्या सिनेमांमधलं आहे. हा बदल चांगला आणि स्वागतार्ह आहे. सिनेक्षेत्रात महिला दिग्दर्शक, तंत्रज्ञ, महिलांवर आधारित सिनेमे यांचं प्रमाण आता खूप नसलं तरी ते हळूहळू वाढताना दिसतंय. हा सकारात्मक बदल आहे. महिला सक्षमीकरणासाठी चित्रपटांचा आधार घेण्यासाठी फेस्टिव्हल उपयोगी ठरेल. फ्लोने आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये महिलांवरील सिनेमे या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे फेस्टिव्हलसाठी हा नवा पायंडा पडला आहे यात शंका नाही.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:26 am

Web Title: film festivals
टॅग Cinema
Next Stories
1 आठवणींची पिगी बँक
2 मालिकावाल्यांची नाटकं!
3 नाव तेवढं सह्य़ाद्री!
Just Now!
X