संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती सिनेमा एक डिसेंबरला प्रदर्शित होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. विशेषत: राजपूत नेत्यांनी याबद्दल अधिक विरोध दर्शवला. त्यामुळे अनेक राज्यांच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी या सिनेमावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘पद्मावती’ वादावर आपली प्रतिक्रिया दिली.

‘भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या राज्यात पद्मावती सिनेमावर बंदी घातली असून हा वाद सेन्सॉर बोर्डाकडून सोडवले जाणं अधिक योग्य असेल,’ असे ते म्हणाले. पद्मावतीच्या विरोधात होणाऱ्या हिंसेबद्दल भाष्य करताना जेटली म्हणाले की, ‘लोकांना जर या सिनेमाचा विरोध करायचा असेल तर त्यांनी तो शांतपणे करावा. कोणीही हिंसेचा मार्ग अवलंबू नये.’

एकीकडे भन्साळी यांच्या सिनेमाचा सध्या देशभर विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे इंडियन फिल्म्स अॅण्ड टीव्ही डायरेक्टर्स असोसिएशनसह (आयएफटीडीए) आणखी १९ वेगळ्या संघटनांनी देशभर रविवारी १५ मिनिटांसाठी आपले काम थांबवले होते. त्यांनी फिल्मसिटीच्या बाहेर प्रदर्शन केले होते. कला क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी त्यांनी चित्रीकरण थांबवले होते.

इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन, वेस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफर्स असोसिएशन, स्क्रिन राइटर्स असोसिएशन, द फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया लिमिटेड, असोसिएशन ऑफ व्हॉईस आर्टिस्टस, सिने कॉस्ट्यूम अॅण्ड मेकअप आर्टिस्ट अँड हेयर ड्रेसर असोसिएशन, सिने सिंगर असोसिएशन, मुव्ही स्टंट आर्टिस्ट असोसिएशन अशा अन्य संघटनांनी रविवारी प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनाला त्यांनी ‘मी स्वतंत्र आहे’ असे नाव दिले.