flashback, ajay devgnमहेश भट्ट मनोज वाजपेयी आणि तब्बू याना काही दिग्दर्शनीय सूचना देता आहे, असे हे छायाचित्र पाहताच तुमचे मत झाले का? पण प्रत्यक्षात महेश भट्टदेखील त्यांच्यासोबत चक्क अभिनय करतोय. तसे सुभाष घईपासून मधुर भंडारकरपर्यंत बरेच दिग्दर्शक स्वत:च्याच चित्रपटात छोटीशी भूमिका साकारताना दिसतातच म्हणा. आपण हिरो व्हायला आलो होतो हे सुभाष घई विसरू इच्छित नसेल, त्याला आपण तरी काय करणार? पण महेश भट्टची ही खेळी अशीही नाही. ‘मंझिले और भी हैं’पासून आपण किती चित्रपटांचे दिग्दर्शन केले हे तो स्वत:ही अचूक सांगेल का याची शंका आहे. एकदा मेहबूब स्टुडिओत तर ‘अंगारे’ आणि ‘ड्युप्लिकेट’ यांचे शेजारी शेजारी सेट लावून त्याने आलटून पालटून दिग्दर्शन केले. तरीही त्याला कधी आपल्याच दिग्दर्शनात छोटीशी का होईना भूमिका साकारण्याचा मोह झाला नाही. तो त्याने हंसल मेहता याच्या दिग्दर्शनात पूर्ण करून घेतला. चित्रपटाचे नाव ‘दिल पे मत ले यार’. गंमत म्हणजे, जुहूच्या एका बंगल्यात महेश भट्टचे अभिनेता रुपातील चित्रीकरण सुरू असताना आम्हा काही ठराविक सिनेपत्रकाराना सेटवर बोलावले. तेव्हा माझा पहिला प्रश्न होता, कलाकाराना दिग्दर्शक म्हणून सूचना करणे सोपे की अन्य दिग्दर्शकाचा सल्ला ऐकून अभिनय केलेला बरा… महेश भट्ट त्याच्या शैलीत खळखळून हसला आणि आपण दिग्दर्शक म्हणून सुखाने वावरू शकतो म्हणाला… २००० सालचा हा त्याचा अभिनयाचा खेळ.