|| पंकज भोसले

‘फाऊंड फुटेज’ हा चित्रप्रकार अतिवापराने काहीसा गंमत हरवून बसलेला आहे. ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भय-भूत चित्रकर्त्यांची फौज या स्वस्तातल्या पर्यायावर सर्वाधिक कल्पना खर्च करू लागली. त्यामुळे झाले काय, की एकसमान भूतशोधन प्रक्रिया असलेले शेकडो सिनेमे तयार झाले आणि त्यातले हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके लक्षात राहिले. ‘क्लोव्हरफील्ड’, ‘रेक’, ‘पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी’ या सिनेमांचा गेल्या दशकात फार गाजावाजा झाला. त्यांच्याच अनुकर्त्यांकडून सर्वाधिक ‘फाऊंड फुटेज’ चित्रपटांची निर्मिती या दशकात झाली. मात्र या दशकावर ठसा उमटवेल इतका लक्षात राहणारा ‘फाऊंड फुटेज’ सिनेमा अद्याप आलेला नाही. याला कारण मोबाइलमधील कॅमेरा वापराला आणि त्यातून अनंतपटीने माध्यमांवर ओतल्या जाणाऱ्या हरप्रकारच्या दृश्यफितींना सरावलेल्या दर्शकांच्या जाणिवा सजग झाल्या आहेत. त्यामुळे यासारख्या चित्रपटातील भय घटनांच्या मर्यादित चौकटीमध्ये प्रेक्षकाला दचकवून सोडण्यासाठी नावीन्य आणण्याची कसोटी चित्रकर्त्यांना पार पाडावी लागते. पॅट्रिक ब्राइस आणि मार्क डय़ुप्लास या जोडगोळीने ‘क्रीप’ या दोन चित्रपटांच्या मालिकेद्वारे दर्शकांना हादरवण्याचा चांगला प्रयत्न केला होता. दोनेक महिन्यांपूर्वी आलेला दिग्दर्शक जेरोम कोहेन ऑलिव्हर यांचा ‘सिक्स्टिन्थ एपिसोड’ काहीशा वेगळ्या मांडणीने लक्षवेधी ठरला आहे. ‘सिक्स्टिन्थ एपिसोड’ हा सर्वार्थाने यूटय़ूब सहजतेने वापरणाऱ्या पिढीचा सिनेमा आहे. फाऊंड फुटेज चित्रनिर्मितीसह यातील व्यक्तिरेखांची चर्चा ही अधिकाधिक या पिढीला अधिक जवळची आहे.

हेलन (रिबेका रमोन), एनार (एनार गूस्क), मार्क (कोडी ह्य़ूएर) या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा व्यवसाय यूटय़ूबवर साहसांच्या चित्रफिती प्रदर्शित करून त्याद्वारे पैसा कमावण्याचा आहे. जगातील कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन लाखो आणि कोटींच्या संख्येने हीट्स मिळविणारे व्हिडीओ ते प्रसारित करतात. (यातील एनार गूस्क हा वास्तव आयुष्यातदेखील प्रचंड गाजत असलेला यूटय़ूबर असून, त्याचे शकडो व्लॉग लोकप्रिय आहेत.) दर्शकांना जे पाहायला आवडते ते, म्हणजेच आपला जीव संकटात घालून विविध प्रकारची साहसे आपल्या व्हिडीओजमधून दाखविण्यावर त्यांचा भर आहे. काही लाखांनी आपले दर्शक घटल्याने त्यांची चिंता वाढलेली दिसते.

चित्रपटाला सुरुवात होते ती या धाडसवीरांकडून यूटय़ूबवर प्रकाशित करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या पंधराव्या भागापासून. ब्राझीलमध्ये चित्रविचित्र झोपडय़ांजवळ शूटिंग सुरू असताना हेलनचा मोबाइल चोरला जातो. मार्क आणि एनार दोघे या चोराचा पाठलाग करीत झोपडपट्टय़ांच्या गल्ल्या-गल्ल्यांमधून कॅमेरासह धावू लागतात. सिटी ऑफ गॉड या चित्रपटातील कोंबडय़ाच्या पाठलागाच्या दृश्याची आठवण करून देणारा हा प्रकार उत्तम जमला आहे. या पंधराव्या भागातच हेलन मोरक्कोमधील कॅसाब्लांका शहरात पुढील भाग चित्रित करण्याची घोषणा करते. हा यूटय़ूबर चित्रकर्त्यांचा चमू प्रवासामध्ये विविध क्लृप्त्या वापरण्याची तयारी करतो.

मोरक्कोमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची शिरस्त्यानुसार कॅमेरासमोरची पर्यटनचेष्टा सुरू राहते. एका वृद्ध महिलेच्या महालसदृश घरात राहण्याची ते तजवीज करतात. शहरातील एक पर्यटक गाइड या तिघांना आपल्या पुतणीच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देतो. अजिबात ओळख नसलेल्या या माणसावर विश्वास ठेवून तिघे एका गूढ ठिकाणी पोहोचतात. हेलन तिथल्या नृत्य सोहळ्यामध्ये समाविष्ट होते. बेभान होऊन तिथे नृत्य करते. मार्कचा कॅमेरा या सर्व क्षणांचे चित्रण करतो. लग्नाचा कसलाच मागमूस नसलेल्या या  सोहळ्यातून तिघे परततात. मात्र हेलनच्या वागण्यात आमूलाग्र बदल झालेला असतो.

दुसऱ्या दिवशी अमानवी शक्तीने झपाटलेली हेलन आणि तिच्या भोवती रक्ताचा सडा मार्कचा कॅमेरा टिपतो. तिला रक्तबद्ध अवस्थेत पाहून बेशुद्ध झालेला मार्क एनार खोलीत दाखल झाल्यानंतर जागा होतो. मग ते दोघे राक्षसी अवतार धारण केलेल्या आणि मध्येच अज्ञात भाषा बोलणाऱ्या हेलनला भूत चित्रपटांतील परिचित दाखल्यांनुसार ख्रिस्ताचे मंत्रोच्चार वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. निष्प्रभ झालेल्या त्या मंत्रोच्चारानंतर या दोघांवर तीन जबाबदाऱ्या येऊन पडतात. पहिली स्वत:चा जीव वाचविण्याची, दुसरी हेलनला सैतानी पाशातून सोडविण्याची आणि तिसरी कॅमेराने टिपलेल्या अमानवी शक्तींबाबतच्या फुटेज सुरक्षितरीत्या राखण्याची.

या टप्प्यावर दोघांमध्ये मतभेद होतात. गूढ महालाच्या मालकिणीचे रहस्य उलगडण्यास सुरुवात होते आणि अरबी अघोरी विद्येच्या साधनेची अपरिचित वाट कॅमेरा पकडायला सुरुवात करतो.

‘फाऊंड फुटेज’ चित्रपट सातत्याने पाहणाऱ्यांचे यातील भयकारी घटकांनी कमी प्रमाणात समाधान होऊ शकेल. सामान्यत: भयकारक चित्रपटांमधील कथानक धोपट घटकांनीच भरलेले असते. येथे त्यावर मात करण्याचा निदान प्रयत्न करण्यात आल्याने, त्या गोष्टींसाठी हे भयपर्यटन करण्यास हरकत नाही.