विविध भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित आणि अनुवादित करणाऱ्या ‘साहित्य अकादमी’ या संस्थेतर्फे एका पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त आयोजित हे प्रदर्शन २० नोव्हेंबपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ठय़ म्हणजे २४ भारतीय भाषांमधील पुस्तके येथे पाहायला मिळणार आहेत.
अकादमीने ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेअंतर्गत भारतातील २४ प्रादेशिक भाषांमधील मान्यवर लेखकांची चरित्रे प्रकाशित केली आहेत. ही चरित्रे १०० ते १५० पानांची असून प्रदर्शनात ती उपलब्ध आहेत. साहित्य अकादमीतर्फे देशातील विविध राज्यांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. या चर्चाचत्रात अनेक मान्यवर साहित्यिक सहभागी होत असतात. या अगोदर झालेल्या चर्चासत्रांमधून जे साहित्यिक सहभागी झाले होते. या चर्चासत्रांची संपादित पुस्तकेही वाचकांना आणि अभ्यासकांना येथे मिळणार आहेत.
याखेरीज साहित्य अकादमीने ‘दुर्मिळ पुस्तक मालिका’ या उपक्रमात प्रकाशिथ केलेली पुस्तके, ‘समकालीन भारतीय साहित्य’ व ‘इंडियन लिटरेचर’ ही साहित्य अकादमीची मासिके, संस्कृत भाषेतील ‘संस्कृत प्रतिभा’ हे त्रमासिक यांचे जुने अंकही अभ्यासकांना येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळालेले लेखक अनंत भावे यांच्या हस्ते नुकतेच प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन साहित्य अकादमी सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, शारदा चित्रपटगृह इमारत, नायगाव, दादर (पूर्व) येथे २० नोव्हेंबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले आहे. प्रदर्शनातील काही पुस्तकांवर २० तर काहींवर ५० टक्के इतकी सवलत देण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन साहित्य अकादमीने केले आहे.