तालिबानमधील धर्माध शक्तींच्या विरोधात लढा देऊन तिथल्या मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या मलाला युसुफझाईची प्रेरणादायी कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘गुल मकई’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘गुल मकई’च्या मोशन पोस्टरमध्ये एक महत्त्वाकांक्षी तरुणी पाहायला मिळते. तिच्या हातातील पुस्तकाला आग लागल्याचं पाहायला मिळतंय. ‘जिहाद आणि धर्माच्या नावाखाली जेव्हा तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला उध्वस्त करत होता..तेव्हा पाकिस्तानच्या एका छोट्याशा गावातून आवाज उठवण्यात आला,’ असा व्हॉइसओव्हर मोशन पोस्टरमध्ये ऐकू येतो. आपल्या शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी तालिबान्यांविरोधात खंबीरपणे उभं राहून आपल्या परिसरातील तरुणींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मलालाने दिलेल्या लढय़ाची दखल संपूर्ण जगाने घेतली. तिच्या या लढय़ावर आधारित हा चित्रपट असणार आहे.

हा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यावर अनेकांना चित्रपटाच्या नावावरून प्रश्न पडला. ‘गुल मकई’ असं नाव या चित्रपटाला का देण्यात आलं असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला. तालिबानच्या दहशतीखाली असताना मलाला ‘गुल मकई’ या नावाने बीबीसी उर्दूसाठी ब्लॉग लिहायची. या ब्लॉगमध्ये तिथं होणारे अत्याचार आणि मुलींना कशाप्रकारे शिक्षण सोडावं लागत आहे, हे सर्व ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करायची. म्हणूनच त्या ब्लॉगवरून या चित्रपटाचं नाव देण्यात आलं आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमजद खान करत आहे.