रेश्मा राईकवार

सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याचे असामान्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची गोष्ट कशी असेल? कर्तृत्व-देशसेवा-बलिदान-समर्पण या सगळ्या संकल्पना तिच्यापासून कोसो दूर होत्या. तिचं स्वप्नं होतं ते विमान घेऊन आकाशात झेपावण्याचं.. या स्वप्नांची कास धरत प्रत्यक्ष वाटचाल करत असताना तिला या सगळ्या संकल्पनांचा खरा अर्थ आकळत गेला. आलेल्या परिस्थितीला तोंड देत धीराने आपल्या स्वप्नाकडे झेपावणारी गुंजन ते हवाई अधिकारी गुंजन सक्सेना ‘द कारगिल गर्ल’ या लौकिकापर्यंत झालेला तिचा प्रवास दिग्दर्शक शरण शर्मा यांनी अत्यंत संयत आणि वास्तवतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हेच चित्रपटाचे खरे यश म्हणता येईल.

लखनौमधला १९८४ च्या आसपासचा काळ. त्या काळात तुम्ही पाहिलेली मोठी स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटा मोठय़ा अवघड होत्या. विमानात बसून आपल्या मोठय़ा भावाबरोबर प्रवास करणाऱ्या छोटय़ा गुंजनलाही खिडकीतून आकाश पहायचं होतं. भावाने लहान बहिणीला दाद दिली नाही, पण गुंजनला त्या खिडकीतून नाही तर थेट वैमानिकाच्या जागेवरून समोर अथांग पसरलेल्या आकाशाचं विलोभनीय दर्शन झालं. विमानाच्या सहाय्याने आकाशात झेपावता येत होतं हे लक्षात आलेल्या गुंजनने एकच ध्यास घेतला होता तो वैमानिक बनण्याचा..मात्र वैमानिक बनण्यासाठी नेमकं  शिक्षण कधी, कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टींची माहिती गुंजनला नव्हती. वैमानिक बनण्याचं तिचं स्वप्न हे हवाईदलात येऊन पूर्ण झालं. मात्र तो प्रवास ना तिच्यासाठी सोपा होता ना काळाच्या ओघात बदलाची कास धरलेल्या हवाईदलासाठी. या सगळ्या प्रवासात तिला तिच्या स्वप्नाशी घट्ट बांधून ठेवण्याचं काम तिच्या वडिलांनी के लं. गुंजनच्या कथेच्या संदर्भाने काळाबरोबर पावलं टाकत बदलण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संरक्षण दलाच्या प्रवासाची झलकही यात पहायला मिळते. आणि हा या चित्रपटातला खूप महत्त्वाचा भाग ठरला आहे. पुरुषांचीच मक्ते दारी असलेल्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी एका मुलीला मिळते. आपल्या परिश्रमाने आणि कर्तृत्व सिद्ध करत एक अधिकारी म्हणून ती उधमपूर हवाई प्रशिक्षण के ंद्रात दाखल होते. मात्र तिच्यासाठी ही जागा नाही, असं तिला ऐकवलं जातं. आत्तापर्यंत हवाईदलात स्त्रियांना प्रवेशच नव्हता, त्यामुळे स्त्रियांसाठी प्रसाधनगृहे नाहीत, कपडे बदलण्यापासूनची व्यवस्थाही नाही आणि तिच्याशी बोलण्यातही सहकाऱ्यांना रस नाही, मात्र कर्तव्यात कसूर होणं तिच्याकडून अपेक्षित नाही. अशा विचित्र कोंडीत अडकलेल्या गुंजनला बाहेर काढून तिला चोख प्रशिक्षण देण्याचे काम तिचे एक वरिष्ठ अधिकारी करतात. आणि तरीही.. गुंजन सक्सेनाला हवाई अधिकारी म्हणून मान्यता मिळण्यासाठी कारगिल युद्धाची अग्निपरीक्षा द्यावी लागते. हा सगळा प्रवास खूप वास्तवतेने दिग्दर्शकाने मांडला आहे. कारगिल युद्धातील एकमेव महिला वैमानिक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुंजन सक्सेना यांचा प्रत्यक्ष युद्धातील शौर्याचा प्रसंगही चित्रपटात आहे. पण मुळात इथे शौर्यात तिळमात्रही कमी नसलेल्या गुंजनला या क्षेत्रात येण्यासाठी घर, भाऊ, समाज आणि अखेर हवाईदलातील पुरुषसत्ताक व्यवस्थेशी, विचारसरणीशी करावा लागलेला संघर्ष दिग्दर्शकाने ठळकपणे जाणवून दिला आहे.

गुंजन आणि तिच्या वडिलांचं नातं यात खूप महत्त्वाचं आहे. अगदी छोटय़ा-छोटय़ा पण प्रभावी संवादातून गुंजनला एक व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी तिच्या वडिलांनी घेतलेली मेहनत लक्षात येते. आपल्या मुलाचे विचार हे परंपरागत विचारांशी जास्त जोडलेले आहेत याची जाणीव असूनही त्याच्या विरोधात जाऊन गुंजनच्या वडिलांनी केलेली तिची जडणघडण दिग्दर्शकाने तितक्याच सुंदर पद्धतीने पडद्यावर आणली आहे. अर्थात, याचे श्रेय जेवढे दिग्दर्शकाला आहे तेवढेच गुंजनच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या पंकज त्रिपाठी यांच्या सहजअभिनयाला आहे. पंकज त्रिपाठी यांची संवादफेक, त्यांची देहबोली आणि अभिनय यामुळे गुंजनचे तिच्या वडिलांबरोबर असलेले गहिरे नाते पडद्यावर अप्रतिम रंगले आहे. त्या तुलनेत जान्हवी कपूरला गुंजन साकारताना घ्यावी लागणारी मेहनत पदोपदी जाणवते. वडिलांबरोबरच्या प्रसंगातही जान्हवीची गुंजन पकड घेत नाही, आणि खुद्द हवाईदलात इतर सहकाऱ्यांबरोबरचा संघर्षही तिला ताकदीने रंगवता आलेला नाही. मात्र चित्रपटाची एकू णच मांडणी, पार्श्वसंगीताबरोबरच ‘अस्मान दी परी’, ‘रेखा ओ रेखा’सारख्या गाण्यांचा कथा पुढे नेण्यासाठी के लेला सुंदर वापर, छायाचित्रण या सगळ्यांमुळे गुंजनची कथा पकड घेते. गुंजन सक्सेनाचा संघर्ष मुळातच भारून टाकणारा आहे पण तो ज्या पद्धतीने वास्तव आयुष्यात घडला असेल त्याच पद्धतीने मांडण्याचा दिग्दर्शकाचा आग्रह या चित्रपटला अधिक परिणामकारक बनवतो, यात शंका नाही.

गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल

दिग्दर्शक – शरण शर्मा

कलाकार – जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, विनीत कु मार सिंग, मानव वीज, अंगद बेदी.

अ‍ॅप – नेटफ्लिक्स