कलाविश्वात सुंदरतेला अधिक प्राधान्य आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे या क्षेत्रात गोरा रंग आणि नितळ त्वचा या साऱ्याला विशेष महत्त्व असल्याचं दिसून येतं . मात्र या सर्व संकल्पनांना छेद देत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने सौंदर्याची एक नवीन परिभाषा मांडली. सौंदर्य म्हणजे बाह्यरुप नाही तर तुमचा आत्मविश्वास हेच खरं सौंदर्य असल्याचं तिने म्हटलं. ती आजही तिच्या मुद्द्यावर ठाम आहे. विशेष म्हणजे कलाकार म्हटलं की बऱ्याचदा ते चित्रपटांव्यतिरिक्त एखाद्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये झळकल्याचं पाहायला मिळतात. मात्र साई पल्लवी या जाहिरातींमध्ये स्पष्टपणे नकार देत असून एकदा तिने तब्बल २ कोटींची ऑफर नाकारल्याचं पाहायला मिळालं होतं.

चेहऱ्याचा रंग उजळविण्याचा तथाकथित दावा करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये आजकाल सर्रासपणे बॉलिवूड कलाकार झळकताना दिसतात. अर्थात त्यातील किती सेलिब्रिटी हे सौंदर्य प्रसाधनं वापरतात हा प्रश्नच आहे. मात्र तरीदेखील लोकप्रियता मिळावी या हेतूने ही कलाकार मंडळी या जाहिरातींमध्ये झळकत असतात. मात्र साई पल्लवीने कोट्यावधी रुपयांची ऑफर नाकारत फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीला चक्क नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai) on

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी विचारणा करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी तिला तब्बल २ कोटी रुपयांचं मानधनही मिळणार होतं. मात्र साई पल्लवीने एवढ्या कोट्यावधी रुपयांचं मानधन धुडकावून लावत ही जाहिरात नाकारली आहे.

साई पल्लवी फार कमी प्रमाणात प्रसाधनांचा वापर करत असते. त्यासोबतच आपल्या त्वचेचा आणि रंगाचा पोत जसा आहे. तसाच सादर करण्याला तिने आधीपासूनच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच तिने ही जाहिरात नाकारली आहे. ‘मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगायला हवा’, असं तिचं मत आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून साई पल्लवीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर ‘अथिरन’, ‘मारी २’ या चित्रपटांनीही तिला विशेष ओळख मिळवून दिली. सुपरहिट चित्रपट देणारी साई पल्लवी चित्रपटांमध्ये कमी मेक-अप करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.