रेश्मा राईकवार

हार्वेचं काय होणार?

हॉलीवूडमध्ये नव्या वर्षांची सुरुवात ही या प्रश्नाने झाली आहे. एरव्ही प्रश्न पडले की माणसांचा त्रागा वाढतो, मात्र हार्वे वेनस्टेनच्या बाबतीत अनेकांना पडलेला प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि त्याचे येत्या काही दिवसांमध्ये मिळणारं उत्तर आणि त्याचे परिणाम या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. गेली दोन वर्ष हॉलीवूडला ज्या ‘#मी टू’ वादळाने झोडपून काढलं होतं त्या वादळाचा केंद्रबिंदू असलेली व्यक्ती म्हणजे हार्वे वेनस्टेन. हॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रस्थापित आणि बडा निर्माता असलेल्या हार्वे वेनस्टेन यांच्यावर दोन वर्षांपूर्वी अ‍ॅश्ले ज्यूड, ग्विनेथ पेल्ट्रो, अँजेलिना जोली यासारख्या अनेक हॉलीवूड अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यामुळे माझ्यासह अनेक अभिनेत्रींची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हार्वेने वेनस्टेनने केल्याचा दावा अ‍ॅश्लेने केला आहे. हार्वे यांच्यावर बलात्काराचाही आरोप आहे. हार्वे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे जगभरात नानाविध क्षेत्रांतील लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आणि ‘#मी टू’ या मोहिमेने जोर घेतला. हार्वे यांच्यावर झालेल्या आरोपांची पडताळणी करून प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध खटला उभा राहण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली आहे. मात्र नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच या प्रकरणावरची न्यायालयीन सुनावणी सुरू होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा हार्वे वेनस्टेन यांच्यावर खिळले आहे. हार्वे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल. या प्रकरणाचा निकाल हा जगभर सुरू असलेल्या ‘#मी टू’ मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या खटल्याच्या निमित्ताने गेल्या महिन्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या हार्वे यांनी मी स्त्रियांसाठी जे काम केले, त्यांच्यासाठी जे चित्रपट केले ते सगळे विस्मृतीत गेले आहे, अशी खंत व्यक्त करत लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्वे वेनस्टेन पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले. केवळ हॉलीवूडच नव्हे संपूर्ण जगभर महत्त्वाचे ठरलेले हे प्रकरण या वर्षांच्या सुरुवातीलाच धसास लागण्याची शक्यता तरी दिसू लागली असल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण आनंदात आहे तर काहींच्या पोटात मात्र भीतीने गोळा यायला सुरुवात झाली आहे.

स्कोर्सेसी आणि सुपरहिरोज!

गेली काही वर्षे सुपरहिरो चित्रपटांबद्दल हॉलीवूडच्या दिग्गज कलाकार-दिग्दर्शकांमध्ये नाराजी आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ती या ना त्याप्रकारे व्यक्त केली आहे. मात्र या सगळ्यात सुपरहिरोपट विशेषत: ‘माव्‍‌र्हल’च्या चित्रपटांवर मार्टिन स्कोर्सेसी यांनी केलेली टीकाटिप्पणी विशेष गाजली. ‘माव्‍‌र्हल’चे सुपरहिरोपट हे चित्रपटच नाहीत, असे स्कोर्सेसी यांचे म्हणणे होते. त्यांनी या चित्रपटांना ‘थीम पार्क’ची उपमा दिली होती. त्यामुळे स्कोर्सेसी आणि माव्‍‌र्हल हा वाद गेल्या वर्षी चांगलाच गाजला. हा वाद आता कुठे कमी होतो आहे म्हणेपर्यंत याची गमतीशीर आठवण स्कोर्सेसी यांना खुद्द त्यांच्या मुलीनेच क रून दिली आहे. मार्टिन स्कोर्सेसी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते ‘द आयरिशमन’ या वेबफिल्ममुळे.. स्कोर्सेसी यांची निर्मिती असलेली आणि त्यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबफिल्म ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकोंच्याही पसंतीस उतरली आहे. त्यामुळे सध्या कौतुकात न्हाऊन निघालेल्या आपल्या वडिलांची गंमत करायचा निर्णय त्यांच्या मुलीने फ्रान्सेस्काने घेतला. तिने नाताळच्या निमित्ताने स्कोर्सेसी यांना छानशी भेटवस्तू दिली आहे, मात्र ही भेटवस्तू देताना तिने ती ‘माव्‍‌र्हल’च्या सुपरहिरोजचे चित्र असलेल्या कागदाच्या आवरणात बांधून दिली. मी वडिलांची भेटवस्तू कशा स्वरूपात देते आहे, हे पाहा.. असे म्हणत तिने या भेटवस्तूचे छायाचित्रही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फ्रान्सेस्काच्या या गमतीशीर भेटवस्तूवर स्कोर्सेसी यांची प्रतिक्रिया कळलेली नाही, मात्र तिच्या या इन्स्टाग्राम स्टोरीला अनेकांक डून तितकाच खेळकर प्रतिसाद मिळाला आहे. खरंतर, आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे सांगत स्कोर्सेसी यांनी आपणही सुपरहिरो चित्रपट पाहिले आहेत. मात्र त्यात सिनेमातून ज्या प्रकारचा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा तो पोहोचत नसल्याचे स्पष्ट करत म्हणूनच सिनेमा म्हणून ते मर्यादित आहेत, असे सांगत या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण खुद्द त्यांच्या घरातूनच माव्‍‌र्हल चाहतीकडून झालेली ही गंमत थोडासा ताण हलका करून गेली म्हणायला हरकत नाही.