News Flash

फ्लॅशबॅक : ‘हातिमताई’ हिंदीत फॅण्टसी चित्रपट

पूर्वी मात्र हिंदीत अशा फॅन्टसी चित्रपटाचा छान सुकाळ होता.

जीतेंद्र आणि संगीता बिजलानी चित्रपट हातिमताई

आज हिंदी चित्रपटरसिकांना कल्पनेच्या रुपेरी राज्यात अर्थात फॅन्टसीसाठी रममाण होण्यासाठी ‘बाहुबली’ची वाट पहावी लागतेय. पूर्वी मात्र हिंदीत अशा फॅन्टसी चित्रपटाचा छान सुकाळ होता. ‘हातिमताई’ ही अरेबिक दंतकथा त्यात हुकमी. कल्पनेच्या जगात विहार करून आणणारी. हवेत चटईवरुन कुठेही प्रवास करणारे नायक-नायिका. (चटईक्षेत्राला मर्यादाच नाही) म्हणजेच अतिशोयोक्तीला भरभरून वाव.

सर्वप्रथम निर्माता-दिग्दर्शक होमी वाडिया यानी कृष्ण धवल ‘हातिमताई’ (१९५६) घडवला. होमी वाडिया, बाबूभाई मेस्त्री हे अशा कल्पनेची उंच-उंच भरारी मारणार्‍या चित्रपटांचे हुकमी फिल्ममेकर्स. होमी वाडिया पौराणिक चित्रपटही निर्माण करीत. या ‘हातिमताई’मध्ये जयराज, कृष्णाकुमारी, शकिला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट खणखणीत यशस्वी ठरल्यानेच की काय अशा चित्रपटांची नवकल्पना बहरली. ‘हातिमताई की बेटी’, ‘हातिमताई और सात दरवाजे’, ‘सन ऑफ हातिमताई’ असे चित्रपट साठच्या दशकात आले.

कालांतराने पहिल्या ‘हातिमताई’चा त्याच नावाने रिमेक आला. एव्हाना रंगीत चित्रपटाचा काळ स्थिरावलेला, तांत्रिक प्रगतीही भरपूर झालेली. आणि जीतेंद्रसारखा बिझी हीरोदेखिल ही गंमत-जमंत साकारण्यास उत्सुक होता. निर्माते रतन मोहन हे मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे निर्माते.(‘खून का बदला खून’ हा त्यांचाच चित्रपट) त्यानी अशा थीमचा हातखंडा असणारे दिग्दर्शक बाबूभाई मेस्त्री यांजकडे या ‘हातिमताई’ची (१९९०) ची सूत्रे सोपवली. संगीता बिजलानी मॉडेलिंगकडून सिनेमात आली आणि सलमान खानची प्रेयसी म्हणून ओळखली जात असतानाच तिने बरेच चित्रपटही स्वीकारले. त्यातही जीतेंद्रची नायिका बनण्याची संधी म्हणजे मोठीच गोष्ट.

हातिमताईची गोष्ट म्हणजे सात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास व त्यातून घडणाऱ्या चमत्कारिक गोष्टी. पूर्णपणे पोशाखी चित्रपट. चित्रपटात सोनू वालिया, अमरिश पुरी, सतिश शहा, आलोकनाथ, रझा मुराद, देवकुमार, राजेश विवेक, विजयेंद्र घाटगे, गोगा कपूर व जोगिंदर अशी कलाकारांची मोठीच फौज. चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत. या रिमेकला आता जवळपास तीस वर्षे होत असताना याचाच रिमेक पडद्यावर आणायला काहीच हरकत नसवी. आता तंत्रज्ञान बरेच प्रगत झालेय, साऊंड सिस्टीम तर थरकाप उडवते आणि मल्टिप्लेक्सच्या पडद्यावर हे कल्पनेतील विश्व आणखीनच बहरेल. ‘हातिमताई’ असे म्हटल्यावर काहीना हा नायिकाप्रधान चित्रपट वाटतो. पण तसे नाही. यात अनेक प्रकारचे पराक्रम लिलया करणारा महापराक्रमी नायक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:05 am

Web Title: hatim tai fantasy movie
Next Stories
1 मला देव हवा होता – मनवा नाईक
2 दिपिकाने केला करिअरबाबतचा धक्कादायक खुलासा
3 मराठमोळ्या देवदत्त नागेचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण
Just Now!
X