News Flash

जादा ‘फिल्मी’

चरित्रात्मक चित्रपट तसेच घडून गेलेल्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढतेय. काल्पनिक गोष्टींपेक्षा सत्य घटनांवर बेतलेले चित्रपट बनविण्याकडे निर्माता-दिग्दर्शकांचा कल असला तरी बॉलीवूड फिल्मी पद्धतीनेच

| February 1, 2015 02:23 am

चरित्रात्मक चित्रपट तसेच घडून गेलेल्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढतेय. काल्पनिक गोष्टींपेक्षा सत्य घटनांवर बेतलेले चित्रपट बनविण्याकडे निर्माता-दिग्दर्शकांचा कल असला तरी बॉलीवूड फिल्मी पद्धतीनेच त्या सत्य घटनेकडे पाहून त्याची मांडणी चित्रपटातून करण्याचा प्रयत्न अधिक केला जातोय असे ‘हवाईजादा’ हा सिनेमा पाहताना प्रकर्षांने जाणवते. ‘फिल्मी स्वातंत्र्य’ चित्रपटकर्त्यांनी या चित्रपटात खूपच अति घेतले असून तरीसुद्धा चित्रपट रंजन करू शकत नाही.
शिवकर बापूजी तळपदे यांनी १८९५ साली मुंबईच्या चौपाटीवर मानवरहित विमान बनवून त्याचे उड्डाण करण्याचा प्रयत्न केला होता. या एकाच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. परंतु, हे करताना ‘फिल्मी’गिरीचा खूप प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे आपापल्या पद्धतीने चित्रण चित्रपटांमधून करण्याचा प्रयत्न सध्या मोठय़ा प्रमाणावर केला जातोय. भारतीय स्वातंत्र्यलढा, ऐतिहासिक राजे, त्यांची कारकीर्द, जुन्या काळातील चित्रकार, गाजलेल्या व्यक्ती यांच्यावरील चित्रपट करताना दिग्दर्शक-निर्माते यांना किमान वस्तुस्थिती आणि लोकांना नीटपणे माहीत असलेला इतिहास दाखवितानाच्या प्रसंगांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक ठरते. अभ्यास करून थोडीशी फिल्मीगिरी करीत अनेक चित्रपट येऊन गेले असून प्रेक्षकांनाही आवडले आहेत.
या चित्रपटात शिवकर बापूजी तळपदे असे मूळ नाव न उच्चारता शिवी असा उल्लेख अधिक वेळा करण्यात आला आहे. हा शिवी ब्रिटिशांच्या काळात जन्मलेला श्रीमंत जमीनदाराचा मुलगा दाखविला असून तो शाळेत अनेक वेळा नापास झालेला आणि उडाणटप्पू अशा प्रवृत्तीचा रेखाटला आहे. घरच्या लोकांनाही नकोसा असलेला हा शिवी एकदा नाटक मंडळीच्या थिएटरमध्ये घुसतो आणि म्हणे पाहताक्षणी नाटकातील शकुंतला ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडतो. पुढे त्याला एक गुरू भेटतो सुब्बराव शास्त्री नावाचा. तुझ्यात काहीतरी खुबी आहे आणि तू अलौकिक कार्य करून दाखवशील असा मला विश्वास आहे असे शिवीला सांगतो आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून दडवून ठेवलेले एक पुस्तक शिवीकडे देतो. एखाद्या पक्ष्यासारखा माणूसही हवेत उंच उडू शकतो याचे ज्ञान या पुस्तकात असते. अर्थात विमान म्हणजे हवाईजहाज बनविण्याचे ज्ञान या पुस्तकात दडलेले असून ब्रिटिशांना याची खबर लागता कामा नये, अन्यथा ते आपल्याला तुरुंगात टाकतील आणि आपले ज्ञान हिरावून घेतील असे हा शास्त्री शिवीला सांगतो. या पुस्तकातील माहितीनुसार विमान बनविण्याचा प्रयत्न एका प्रयोगशाळेत प्रयोग करून शास्त्री करू पाहतात. त्यात त्यांना शिवी आणि शिवीचा छोटा पुतण्या नारायण मदत करतो. पुढे शास्त्री मरण पावतात आणि विमान बनवून त्याचे उड्डाण करण्याचा प्रयत्न शिवी ऊर्फ शिवकर तळपदे करतो.
अखंड चित्रपट शिवकर ऊर्फ शिवी आणि त्याचे स्वप्नाळू जग या दृष्टिकोनातून दिग्दर्शकानं उलगडला आहे. ब्रिटिश काळातील मुंबईचे चित्रण असो की तत्कालीन लोकांची वेशभूषा, वागणे-बोलणे असो एक प्रकारचा स्वप्नाळूपणा आणि कृत्रिमपणाचे वातावरण अखंड सिनेमात दिग्दर्शकाने ठेवले आहे. तळपदे हे मराठी होते म्हणून आयुषमानच्या तोंडी अधूनमधून मराठी वाक्यांची पेरणी संवादातून केली आहे. नाटक मंडळीद्वारे लोकांसमोर नाटक सादर करणारे लोक आणि त्यातील अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या तरुणी वारांगना दाखविण्याचा प्रयत्न केवळ हास्यास्पद म्हणावा लागेल. ब्रिटिशकालीन मुंबई, ज्या बोटीत शास्त्री राहतात ती बोट हे सारे तकलादू वाटत राहते. प्रेक्षकाला स्वप्नाळू दुनियेची सफर केल्यासारखे वाटत राहते. शास्त्री या भूमिकेतील मिथुन चक्रवर्तीने बऱ्याच कालावधीनंतर हिंदीच्या रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांना दर्शन दिले असून त्याने भूमिका उत्तम वठवली आहे. आयुषमान खुरानाला मराठी असलेले तळपदे हे व्यक्तिमत्त्व झेपलेले नाही, शोभतही नाही. फक्त एक स्वप्न उराशी बाळगून त्या स्वप्नवत दुनियेत वावरायचे असेच जणू दिग्दर्शकाने त्याला सांगितले असावे त्यामुळे त्यानुसार अभिनय करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. परंतु, आयुषमान खुरानाला अभिनेता म्हणून प्रमुख व्यक्तिरेखा भावणे, त्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणे आणि मग त्याबरहुकूम अभिनय करणे हे जमलेले नाही. पल्लवी शारदा, जयंत कृपलानी यांच्याही बेतास बात अशा भूमिका आहेत. मुळात या चित्रपटाचा जीव लहान असताना भरमसाट गाणी आणि संगीत घुसडून आणि स्वप्नाळू दुनियेची सफर घडविण्याचा प्रयत्न करून चित्रपट उगीचच लांबलचक केला आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहताना न कंटाळला तरच नवल.

हवाईजादा
निर्माते – विशाल गुरनानी, राजेश बंगा, रिलायन्स एण्टरटेन्मेंट
दिग्दर्शक – विभू पुरी
लेखक – विभू पुरी, सौरभ भावे
छायालेखक – सविता सिंग
संकलक – शान मोहम्मद
संगीत – मंगेश धाकडे, रोचक कोहली, विशाल भारद्वाज, आयुषमान खुराना
कलावंत – आयुषमान खुराना, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा, जयंत कृपलानी, जेफ्री गोल्डबर्ग व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 2:23 am

Web Title: hawaizaada quite filmy
टॅग : Movie Review
Next Stories
1 ‘गर्दिश में तारे’
2 जॅकलिनच्या चित्रकलेला सलमानची प्रेरणा
3 तिसरी ‘हेराफेरी’ अक्षयविनाच
Just Now!
X