रेश्मा राईकवार

हेलिकॉप्टर ईला

सुपर मॉम, हेलिकॉप्टर मॉम या संकल्पना आपल्याकडे आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. आई मग ती एकल पालक असो, चौकोनी कुटुंबात रमणारी असेल किंवा मोठय़ा कुटुंबाचा व्याप सांभाळण्यात हरवून गेलेली असेल. आपल्या संसारात स्त्री इतकी अडकून बसते की स्वत:साठी काहीतरी करायला हवे, ओळख जपायला हवी याचे भानच तिला उरत नाही. किंबहुना, स्वत:त हरवणे म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे या गृहीतकाखाली त्यांचे आयुष्य निघून जाते. पण सुपरमॉम होण्याची धडपड इतकी मोठी असते की त्या बदल्यात आपण आयुष्य गमावले आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. हेलिकॉप्टर ईला या चित्रपटात दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी ही गोष्ट साचेबद्ध पद्धतीनेच मांडली असल्याने तिथल्या तिथे रेंगाळत राहते. ईलाचा प्रवास आपल्याला घटकाभर करमणूक देतो पण प्रभावी ठरत नाही.

हेलिकॉप्टर मॉम होण्यामागचे ईला रायतुरकरचे (काजोल) कारण वेगळे आहे. चित्रपट सुरू होतो तेव्हा ईला आपल्याच मुलाच्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली आहे. ईलाचा भूतकाळ हा तिच्या आणि पर्यायाने तिच्या मुलाच्या विवानच्या (रिद्धी सेन) घट्ट नात्याशी जोडलेला आहे. एकेकाळची उत्साही, आत्मविद्धासाने भरलेली, पाश्र्वगायिका होण्यासाठी धडपडणारी ईला आज ते सगळे सोडून जेवणाचे डबे बनवायचे काम करते. तिचे अवघे आयुष्य हे विवानभोवती फिरते. अर्थात, त्याला दिग्दर्शकाने वैयक्तिक कारण दिले आहे. ईला, तिचा पती अरुण यांचे बहरलेले नाते आणि अचानक विवानच्या जन्मानंतर अरुणचे त्यांना सोडून जाणे यामुळे एका क्षणी आपला सगळा आनंदी भूतकाळ सोडून ईला विवानलाच आपले आयुष्य मानते. सतत विवानची काळजी करणारी, त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणारी, तितकीच खेळकर-मैत्रिपूर्ण स्वभावाची आई विवानला आवडते. त्याचे तिच्यावर प्रेम आहे मात्र कुठेतरी सतत तिची त्याच्या आयुष्यात सुरू असलेली ढवळाढवळ त्याला त्रास देते. विवानचे मित्रमैत्रिणी आणि त्याचा समजूतदारपणा त्याला कधीही आईबद्दल टोकाची भूमिका घेऊ देत नाही. या दोघांचाही एकमेकांना समजून घेत, कधी भांडत तर कधी अति प्रेमाने सुरू असलेला प्रवास हा चित्रपटातला अगदी आनंदाचा आणि खूप काही देऊन जाणारा भाग आहे.

एकाक्षणी ईलाने आपली आई होऊन राहण्यापेक्षा पूर्वीची गायिका ईला म्हणून सूर शोधावा यासाठी विवान ठोस भूमिका घेतो. या दोघांच्या नात्यांचा बदलत गेलेला प्रवास, काही मिळालेले-काही हरवलेले क्षण आणि सरतेशेवटी दोघांनीही आपला अवकाश जपत पुढे नेलेले नाते म्हणजे हेलिकॉप्टर ईलाची गोष्ट म्हणता येईल.

ईला आणि विवानचे नाते, त्यातले बदल आजच्या विचारसरणीशी सुसंगत आहेत आणि तेच चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. मात्र ईलाचा पाश्र्वगायिका म्हणून झालेला प्रवास जितक्या सहजतेने येतो, तितक्याच ठोकळेबाज पद्धतीने तिला महाविद्यालयात मिळणारा पाठिंबा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, तिचे गाणे हा प्रवास दिसतो. त्याअर्थाने एका मर्यादेपलिकडे ईलाची व्यक्तिरेखा उंच होतच नाही, ती त्याच परिघात फिरताना दिसते. त्याउलट, विवानची व्यक्तिरेखा मात्र दिग्दर्शकाने खूप सुंदर रेखाटली आहे. आईच्या अतिप्रेमाचा त्याला त्रासही होतो, मात्र तिच्या वागण्यामागचे कारण लक्षात घेत विवान स्वत:ला बदलताना दिसतो. विवानच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे खूप ठळक पद्धतीने समोर येतात आणि रिध्दी सेन या अभिनेत्याने अगदी सहजगत्या या सगळ्या छटा रंगवल्या आहेत.

अभिनेत्री म्हणून काजोलच्या क्षमतेवर शंका घेण्याचे कारणच नाही मात्र ईलाच्याच व्यक्तिरेखेला जास्त महत्त्व देण्याच्या नादात सबकुछ काजोल हा अनुभव तितकासा सुखावत नाही. छोटय़ाशाच भूमिकेत नेहा धुपिया लक्षात राहते. तर ईलाच्या सासूची भूमिकाही खूप चांगल्या पद्धतीने रंगवली आहे. आपल्या पतीची भूमिका लक्षात घेतल्यानंतर एकहाती निर्णय घेणारी ईला, ईला आणि विवान दोघांनीही गरज म्हणून त्याचे असणे नाकारणे, प्रत्येक घटनेतून एकमेकांना समजून घेत बदलणारे त्यांचे नाते असे काही मोजके सुंदर क्षण हा चित्रपट आपल्याला देतो. मात्र या हेलिकॉप्टरने या विचाराची उंची अधिक वाढवत उड्डाण केले असते तर हा प्रवास अधिक सुंदर झाला असता.

* दिग्दर्शक – प्रदीप सरकार

* कलाकार – काजोल, रिद्धी सेन, नेहा धुपिया.