काही दिवसापूर्वी गणपतीच्या मुर्तीसमोर चप्पल घालून उभं राहिल्यामुळे ट्रोल झालेली अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा ट्रोलकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. जीममध्ये घाम गाळत असताना शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली. छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहेलाता है' या मालिकेमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारलेली हिना खान अनेक वेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. 'बिग बॉस ११'च्या घरात शिल्पा शिंदेबरोबर असलेल्या तिच्या वादामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. हिना अनेक वेळा तिच्या चुकीच्या वर्तनामुळे ट्रोल होत असते. हीच वेळ पुन्हा तिच्यावर आली आहे. हिना अनेक वेळा जीममधील एक्सरसाईजचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही वेळा तिच्या या फोटो, व्हिडिओवर सकारात्मक कमेंटही येतात. मात्र अनेक वेळा तिला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी तिला धर्माचा आदर करणे, कपडे व्यवस्थित परिधान करणं असे सल्लेदेखील दिले आहेत. Making it “SORE” @vikky2121 A post shared by Hina Khan (@realhinakhan) on Aug 17, 2018 at 2:51am PDT हिनाने यावेळीही असाच जीममध्ये घाम गाळतानाचा फोटो शेअर केला. मात्र या फोटोवर नेटकऱ्यांनी स्तुतीसुमनांऐवजी टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं. काही नेटकऱ्यांनी तिला व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला. तर फोटो शेअर करण्यासाठी ती जीममध्ये जाते असंही काही जणांनी म्हटलं. दरम्यान, 'जिममध्ये घाम गाळल्यानंतरही तुझ्या वाट्याला चांगल्या भूमिका येतच नाही', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर 'सोशल मीडियावर झळकण्यासाठी जिममध्ये घाम गाळणारी पहिलीच महिला पाहिली आहे', असंही एका युजरने म्हटलं आहे. काहींनी तर तिला 'फ्लॉप' किंवा 'लज्जास्पद वर्तन' अशाही कमेंट केल्या आहे. विशेष म्हणजे हिना अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. मात्र ती या ट्रोलकऱ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसते.