हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच या विस्तीर्ण कलाविश्वाचाच एक भाग म्हणजे आर.के. स्टुडिओ. अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत ‘शो मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली. हा स्टुडिओ अस्तित्वात आल्यापासूनच जणू काही एका नव्या पर्वाचीच सुरुवात कलाविश्वात झाली. अशी ही वास्तू एक प्रकारे आठवणींची साठवण करणारं एक ऐतिहासिक ठिकाणच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, आता मात्र या आठवणींना संग्रही ठेवणारी ही वास्तू कायमची विस्मृतीत जाणार आहे. कारण, कपूर कुटुंबीयांनी आर.के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टुडिओच्या देखरेखीचा खर्च न परवडणारा असल्याचं सांगत आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचंही प्रमाण अत्यल्प असल्याचं सांगत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. आर.के. स्टुडिओ विकला जाणार हे कळताच अनेकांनीच या वास्तूशी जोडल्या गेलेल्या काही आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. चला तर मग आर.के. विषयीच्या काही रंजक गोष्टी आपणही जाणून घेऊयात…

‘आर.के. फिल्म्स’ या निर्मिती संस्थेची सर्व सूत्र ही आर.के. स्टुडिओतूनच हाताळली जायची. मुंबईतील चेंबूरमध्ये ही वास्तू उभी असून, अभिनेते राज कपूर यांच्याच नावावरुन त्या वास्तूचंही नामकरण करण्यात आलं होतं. १९४८ मध्ये या स्टुडिओची स्थापना करण्यात आली. ज्यानंतर ‘आग’ या पहिल्याच चित्रपटाची निर्मितीही झाली. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र फारसा गाजला नाही.

वाचा : ‘आता हा पांढरा हत्ती परवडत नाही’; ऋषी कपूर विकणार आर.के. स्टुडिओ

‘आग’च्या वाट्याला अपयश आलं असलं तरीही त्यानंतर ‘बरसात’ (१९४९) या चित्रपटाने सर्व गोष्टी बदलल्या. त्यामागोमाग ‘आवारा’ (१९५१), ‘बूट पॉलिश’, ‘जागते रहो’, ‘श्री ४२०’ या चित्रपटांनीकही तो काळ गाजवला. आवाराच्या यशाचा डंका तर थेट सातासमुद्रापारही वाजला.

आर.के. स्टुडिओच्या बाहेरच जे प्रसिद्ध चिन्ह दिसतं तीच या स्टुडिओची एक ओळख आहे. ‘बरसात’ या चित्रपटातील एका दृश्याचच ते प्रतिक असल्याचं म्हटलं जातं.

फक्त चित्रपट आणि त्यांच्या निर्मितीसाठी किंवा प्रतिष्ठीत कुटुंबाच्या मालकीची वास्तू म्हणूनच नव्हे, तर आर.के. स्टुडिओ आणखी एका कारणासाठीही ओळखला जातो. ते कारण म्हणजे या स्टुडिओमध्ये साजरा होणारे सण- उत्सव. ६० च्या दशकापासून या स्टुडिओमध्ये राज कपूर यांनी होळी आणि गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. या सणांच्या उत्साह तर आर.के.मध्ये असायचाच शिवाय सेलिब्रिटींची उपस्थिती या उत्सवाची रंगत आणखीनच वाढवून जायची.

हल्ली ज्याप्रमाणे सेलिब्रिटी पार्टीमध्ये माध्यमांनाही आमंत्रण दिलं जातं ती पद्धत आर.के. स्टुडिओने कधीच पाळली नाही. आर.के. मध्ये होणाऱ्या पार्टीला माध्यमांच्या प्रतिनिधींची क्वचितच उपस्थिती असायची. त्या वास्तूत होणाऱ्या कार्यक्रमांच्या चर्चांनी बातमीपत्रांचे रकाने भरु नयेत हाच राज कपूर यांचा त्यामागचा हेतू होता.

अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांच्या लग्नाच्या वेळी म्हणजेच १९८० मध्ये आर.के. स्टुडिओमध्ये जवळपास २० दिवस विविध कार्यक्रम आणि पार्टी सुरु होत्या. त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित केलेला स्वागत सोहळाही त्याच वास्तूत पार पडला होता.