‘एक्समेन’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘लोगान’ उर्फ ‘वुल्वरिन’ या व्यक्तिरेखेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ह्यू जॅकमन हा ऑस्ट्रेलियन अभिनेता वुल्वरिनच्या भूमिकेत इतका चपखल बसला आहे की तीच त्याची ओळख बनून गेली आहे. वुल्वरिनची व्यक्तिरेखेवर खुद्द जॅकमनचा इतका जीव जडला आहे की केवळ वुल्वरिनची कथा सांगणारा स्वतंत्र चित्रपट करावा, ही त्याची इच्छा होती. जेम्स मॅनगोल्ड दिग्दर्शित ‘द वुल्वरिन’ या चित्रपटाच्या रूपाने जॅकमनची इच्छा पूर्ण होते आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट संपूर्ण जगभर प्रदर्शित होत आहे. गेली १२ वर्षे मी या चित्रपटासाठी वाट पाहिली आहे. पहिला ‘एक्समेन’ हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हापासून वुल्वरिनचा विचार डोक्यात घोळत होता आज कुठे तो पूर्ण होतो आहे, अशी भावना ह्यु जॅकमनने यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
‘एक्समेन’ या म्युटंट्सची कथा रंगवणाऱ्या चित्रपटातून वुल्वरिन प्रेक्षकांना पहिल्यांदा भेटला. वुल्वरिनच्या भूमिकेने जॅकमनला रातोरात प्रसिध्दी मिळवून दिली. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जॅकमन भारत भेटीवर आला होता. शाहरूख खान आणि विद्या बालनबरोबर त्याने के लेल्या नृत्यामुळे तो खास चर्चेत आला. जॅकमनच्या वुल्वरिनचे चाहते इतके आहेत की एक्समेनचा प्रीक्वल ‘एक्समेन ओरिजिन्स’मध्ये वुल्वरिन नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. पण, ‘एक्समेन ओरिजिन’ या चित्रपटात आपले म्हणजेच वुल्वरिनचे नसणे एकप्रकारे ‘द वुल्वरिन’ या चित्रपटासाठी लाभदायक ठरले आहे, असे मत जॅकमनने व्यक्त केले.
‘द वुल्वरिन’ हा चित्रपट केवळ कॉमिकमधील वुल्वरिनच्या कथेवर बेतला आहे. आजवरच्या एक्समेन चित्रपटमालिकेत आपल्याला वुल्वरिनच्या व्यक्तिरेखेचा आत्मा गवसलेला नाही, ही माझी खंत होती. पण, ‘द वुल्वरिन’मध्ये तुम्हाला खरा वुल्वरिन आणि त्याचे सामथ्र्य, विलक्षण व्यक्तिमत्व पहायला मिळेल, अशी खात्रीच जॅकमनने आपल्या चाहत्यांना दिली आहे.