‘द इन्क्रेडिबल्स २’

२००४ साली ‘द इन्क्रेडिबल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुपरहिरोंची गर्दी नसलेल्या त्या काळात ‘टॉय स्टोरी’, ‘आईस एज’सारख्या अ‍ॅनिमेशनपटांतून आलेल्या व्यक्तिरेखांनीच प्रेक्षकांवर राज्य केले होते. पिक्सरचा ‘द इन्क्रेडिबल्स’ हा त्या अर्थाने अ‍ॅनिमेशनपटांतून लोकप्रिय झालेला नवा सुपरहिरो होता. एका तपापेक्षाही जास्त उशिराने पुन्हा या सुपरहिरोची कथा प्रेक्षकांसमोर आणताना दिग्दर्शक ब्रॅड बर्ड यांनी सूत्रे नायकाच्या हातातून नायिकेकडे दिली आहेत. अर्थात, सुपरहिरो आणि सामान्य माणूस यांच्यात जे काही वादविवाद होऊ शकतात तोच धागा पकडत दिग्दर्शकाने पुन्हा एकदा या ‘द इन्क्रेडिबल्स’ कुटुंबाला एकत्र आणत प्रेक्षकांना मनोरंजनाचा तेवढाच निखळ अनुभव पुन्हा एकदा दिला आहे.

सरकार, सुपरहिरो आणि सामान्य माणूस यांच्यातील कधी ताण्याबाण्याचे नाते आणि तरीही सामान्यांना त्यांचा वाटणारा आधार, त्यातून दृढ झालेले सुपरहिरोंचे अस्तित्व या गोष्टी गेल्या दहा वर्षांत माव्‍‌र्हलपटांनी आपल्या वेगवेगळ्या फ्रँचाईझींमधून लोकांसमोर आणल्या आहेत. माव्‍‌र्हलच्या ‘एक्समेन’ आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या दोन्ही चित्रपट मालिकांमधून आलेली ही गोष्ट आपल्या बॉब आणि कुटुंबीयांच्या बाबतीत पुन्हा घडली आहे. जगाला संकटातून वाचवण्याचा विडा उचललेली ही ‘द इन्क्रेडिबल्स’ मंडळी चित्रपटाच्या सुरुवातीलाच थेट मिशनवर दिसतात. बॉब, हेलन हे दोघेही आपापल्या परीने बँक लुटणाऱ्या कोणा एका व्यक्तीला थांबवण्याचा शर्थीने प्रयत्न करताना दिसतात. व्हॉयलेट आणि डॅशवर सगळ्यात तान्ह्य़ाची जॅक-जॅकची जबाबदारी सोपवून त्यांची धावाधाव चाललेली आहे. एका क्षणाला बॉब, हेलन, व्हॉयलेट आणि डॅश चौघेही आपापल्या परीने ही कामगिरी पार पाडण्यासाठी एकत्र येतात. मात्र बँक लुटली जाते. लुटणारा फरार होतो केवळ त्याने सोडलेल्या मशीनमुळे होणारा अनर्थ ही मंडळी वाचवू शकतात. मात्र त्याच वेळी आजूबाजूच्या गोष्टींचेही नुकसान होते. या नुकसानीसाठी इन्क्रेडिबल्सला जबाबदार ठरवत सगळ्या सुपरहिरोंवर बंदी घातली जाते. पुन्हा एकदा सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याच्या विचारात असलेल्या बॉब-हेलन आणि फ्रोझनला विन्स्टन आणि एव्हलिनच्या रूपाने तारणहार मिळतात. इथपासून मात्र सगळी सूत्रे हेलनच्या म्हणजेच इलॅस्टिगर्लच्या हातात येतात. पूर्वार्धात एकाच वेळी समांतर चालणारे दोन प्लॉट आणि उत्तरार्धात या कुटुंबाला मिशनवर एकत्र आणत रचलेला अ‍ॅक्शनपॅड खेळ ही या चित्रपटाची खासियत आहे.

एकीकडे सुपरहिरो ‘मि. इन्क्रे डिबल’ बॉब आपल्या कुटुंबाला सांभाळतो आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी हेलन म्हणजेच इलॅस्टिगर्ल जगाला म्हणण्यापेक्षा सुपरहिरोजवरची बंदी उठावी आणि त्यांना आपल्या पॉवर्स वापरण्याचे अधिकार मिळावेत म्हणून काम करते आहे. या दोघांचेही स्वभाव आणि जबाबदारी यांच्यातली स्थित्यंतराची कथा या चित्रपटाला रंजक बनवते.

‘मी घर सांभाळू शकतो’, असे अभिमानाने हेलनला सांगून मोकळा झाल्यावर प्रत्यक्षात मोठी होत चाललेली व्हॉयलेट, डॅशचा अभ्यास आणि जॅक-जॅकची मस्ती या तिघांना काबूत आणताना बॉबची दाणादाण उडते. जगाला वाचवणे हेच आपले मिशन मानणारा बॉब मनापासून डॅशसाठी रात्री जागून गणिताचा अभ्यास करताना दिसतो, जॅक-जॅकच्या सुपरपॉवर्सना नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल?, याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे व्हॉयलेट आणि बॉब हे बापलेकीतले नातेही सावरताना दिग्दर्शकाने खूप छान पद्धतीने दाखवले आहे. सुपरहिरो ते बाप हा बॉबचा प्रवास आणि आई ते सुपरहिरो हा हेलनचा प्रवास या दोन्ही प्लॉटमुळे चित्रपट कुठल्याही वयोगटातील प्रेक्षकाला बांधून ठेवतो. अर्थात, ज्या पिढीने तरुणपणी ‘मि. इन्क्रेडिबल’ची जादू अनुभवली आहे त्यांना तीही उत्तरार्धात अनुभवायला मिळते. मात्र यावेळी एकूणातच इलॅस्टिगर्लकडे नेतृत्व आहे. आणि कदाचित सिक्वलची सोय म्हणून असेल पण जॅक-जॅकचे सुपरपॉवर्स दाखवत दिग्दर्शकाने आणखी एक नवा पर्यायही उभा केला आहे. त्यामुळे एका पिढीचे स्मृतीरंजन तर नव्या पिढीला संपूर्णपणे नवीन कथा या दोन्ही गोष्टी दिग्दर्शकाने साधल्या आहेत. कुठेही मनोरंजनात कमी न पडणारा हा चित्रपट इतक्या वर्षांनंतर येऊनही निखळ अनुभव देतो.