हल्ली कलाविश्वात प्रत्येक कलाकाराच्या मानधनाची गणितं झपाट्याने बदलताना दिसतात. कलाकारांची लोकप्रियता, चित्रपटसृष्टीतील त्यांचे स्थान आणि एकंदरच त्यांची पात्रता या सर्वच गोष्टी लक्षात घेत निर्मात्यांकडून कलाकारांना मानधन दिले जाते. अनेकदा बड्या कलाकारांना दिलेल्या मानधनाचा आकडा ऐकून आपले डोळे विस्फारतात. परंतु, यामध्ये धक्का बसण्यासारखे काय आहे, असा प्रश्न चित्रपट समीक्षक, पत्रकार राजीव मसंद यांनी उपस्थित केला आहे. एका पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राला पाच मिनिटांच्या परफॉ्र्मन्ससाठी जवळपास ४ ते ५ कोटी रुपयांचे मानधन देण्यात आल्याची सध्या चर्चा आहे. याविषयी राजीव मसंद यांनी ट्विटद्वारे भाष्य केले.

सोशल मीडियावर सध्या मसंद यांचे हे ट्विट बरेच चर्चेत आले आहे. त्या वेबसाईटने ‘धक्कादायक’ वृत्त म्हणून प्रियांकाच्या मानधनाची बातमी प्रसिद्ध केली होती. पण, ‘यात धक्का बसण्याचे कारण काय? असाच प्रश्न विचारत मसंद यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त मानधन मिळाले तर, त्यात मोठी बाब काय? हे किती प्रतिगामी विचार आहेत, मुळात विचारपद्धती बदलण्याची गरज आहे’, असे ते ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

राजीवच्या या ट्विटनंतर अक्षय राठीने ट्विट करत हा लिंगभेदाचा मुद्दा नाही. पण, मानधनाचा मुद्दा अधोरेखित करत प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचाच हा प्रयत्न आहे. प्रियांका आणि दीपिका या दोन्ही अभिनेत्री इरफान (इरफान खान) आणि पुलकित (पुलकित सम्राट) यांच्याहून जास्त मानधन घेतात. त्यामुळे प्रत्येक मुद्दा लिंगभेदाशीच जोडला जाण्याची गरज नाही, असे ट्विट केले. त्याच्या या ट्विटनंतर राजीवने पुन्हा एकदा हा लिंगभेदाचाच मुद्दा आहे असे ठाम मत मांडले. या ठिकाणी कोणा अभिनेत्याला इतके मानधन मिळाले असते तर त्याच्याविषयी धक्कादायक वृत्ताच्या नावाखाली अशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसत्या. माझ्या मते कोणत्याही अभिनेत्यापेक्षा लाइव्ह परफॉर्मन्समध्ये प्रियांका भान हरपून परफॉर्म करते. त्यामुळे तिला घसघशीत मानधन का मिळू नये?, असा सवालही राजीव मसंद यांनी विचारला.

वाचा : ‘जब वी मेट・मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

कलाकारांना मिळणारे मानधन हा त्यांच्या कामाचा मोबदला असतो. प्रत्येक कामाचा स्तर आणि कलाकाराची लोकप्रियता या निकषांवर मानधनाचा आकडा ठरत असला तरीही काही बाबतीत मात्र या विषयाला उगाचच जास्त महत्त्वं दिले जात असल्याचेही मत अनेकांनी मांडले त्यामुळे कलाकार आणि त्यांच्या वाट्याला येणारे मानधन हा कधीही न संपणारा चर्चेचा विषय आहे ही बाब नाकारता येणार नाही.