गोव्यात ‘इफ्फी’चा उत्साह; महोत्सवाचे प्रत्यक्ष आणि दूरदृश्य पद्धतीने आयोजन

मुंबई : करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) १६ जानेवारी रोजी गोव्यात सुरू  झाला असून माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘इफ्फी’चा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळेस इटालियन छायाचित्रकार विट्टोरियो स्टोरायो यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या महोत्सवात रसिकांना ६० देशांतील १२६ चित्रपट पाहण्यास मिळतील.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणारा हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे जानेवारी महिन्यात पुढे ढकलण्यात आला. सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट महोत्सव प्रत्यक्ष आणि दूरदृश्य अशा दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. थॉमस विंटरबर्ग दिग्दर्शित ‘अनदर राऊंड’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते तसेच बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी पुरस्कार’ जाहीर झाला असून मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शेख मुजीबुर रेहमान यांच्या १०० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बंगबंधू’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल. कलायडोस्कोप या विभागात अ‍ॅलेक्स पिंपेर्नो दिग्दर्शित ‘विंडो बॉय’, मोहम्मद हयाल दिग्दर्शित ‘हईफा स्ट्रीट’ आणि गुस्तावो गॅलवानो दिग्दर्शित ‘डीप ब्लॅक नाईट’ हे चित्रपट दाखवण्यात येत आहेत. कियोशी कुरुसोवा दिग्दर्शित ‘वाईफ ऑफ स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता करण्यात येईल.

‘इफ्फी’मध्ये मराठी चित्रपट

चित्रपट महोत्सवात शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’, मंगेश जोशीचे दिग्दर्शन लाभलेला ‘कारखानीसांची वारी’ आणि वैभव ख्रिस्ती, सहृद गोडबोलेचा ‘जून’ हे तीन चित्रपट ‘इफ्फी’त दाखवण्यात येत आहेत. याबरोबरच ‘खिसा’ हा लघुपटही दाखवण्यात येणार आहे.