गेल्या वर्षी पहिलाच पुरस्कार सोहळा हाँगकाँगमध्ये साजरा केल्यानंतर ‘इम्फा’ पुरस्कार सोहळा आता युरोपच्या समुद्रसफरीदरम्यान साजरा होणार आहे. ‘नॉर्वेजियन एपिक क्रूझ’वरून युरोपच्या समुद्रातून बार्सिलोना, नेपल्स, रोम, फ्लोरेन्स, कान अशा नयनरम्य शहरांचा प्रवास करत २५ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या काळात ‘इम्फा’ सोहळा पार पडणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तारेतारकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळय़ात अभिनेता सुनील शेट्टीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारमंडळींचा सहभाग असणार आहे. या पुरस्कारांचा नामांकन सोहळा अलीकडेच लवासा येथे पार पडला. त्यावेळी बोलताना इम्फाचे संचालक चिदंबर रेगे यांनी ‘हा सात दिवसांचा सोहळा म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा महोत्सव असेल,’ असा विश्वास व्यक्त केला. तर सातासमुद्रापार होणारा हा सोहळा लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरून प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असे कलर्स मराठीचे प्रकल्प प्रमुख अनुज पोद्दार यांनी सांगितले.