मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही हे लक्षात घेत सेटवरील कलाकार आणि तंत्रज्ञांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय निर्माते आणि ब्रॉडकास्टर्स यांनी घेतला आहे. यापूर्वी के वळ सेटवर काही अपघात झाल्यास विमा संरक्षण दिले जात होते. आता आजारपणासाठी पहिल्यांदाच मालिके तील कलाकार-तंत्रज्ञांना विमा संरक्षण दिले जाणार असल्याने हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

गेले तीन महिने चित्रीकरण बंद असल्याने ठप्प झालेल्या मनोरंजन उद्योगाला गती मिळावी यासाठी राज्य सरकारने निर्मात्यांना सशर्त चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार गेले काही दिवस चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी सेटवर काय आणि कशा पद्धतीने काळजी घेतली जावी, या संदर्भात निर्मात्यांच्या विविध संघटना आणि ब्रॉडकास्टर्स यांच्यात चर्चा सुरू आहे. सध्या करोना प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही आणि त्याही परिस्थितीत काळजीपूर्वक चित्रीकरण करावे लागणार असल्याने सेटवर एखादा कलाकार किंवा तंत्रज्ञ यांच्यापैकी कोणाला करोनाची लागण झाल्यास त्याला उपचारासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कलाकार-तंत्रज्ञांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली. कलाकार-तंत्रज्ञांना विमा संरक्षण मिळवून देण्यासंदर्भातील निर्णय निर्माते आणि ब्रॉडकास्टर्स यांनी एकत्रितरीत्या घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी के वळ अपघाती मृत्यू असेल तरच कलाकार-तंत्रज्ञांना विम्याचे पैसे मिळत होते. आता मात्र करोनाचा धोका लक्षात घेत कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात करोना झालेल्या व्यक्तीला रक्तदाब, मधुनेह, ह्रदयविकार असेल तरीही त्यांना विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती नितीन वैद्य यांनी दिली. विम्याचा खर्च सुरुवातीला निर्माते उचलतील आणि त्यानंतर ब्रॉडकास्टर्सकडून ती रक्कम दिली जाणार आहे.

‘इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही प्रोडय़ुसर्स कौन्सिल’ या निर्मात्यांच्या संघटनेने कलाकार-तंत्रज्ञांना विमा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

माहिती संकलन सुरू

या निर्णयानुसार प्रत्येक निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवरील कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय अशा प्रत्येकाची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे कामही सुरू झाले असून लवकरच ही माहिती विमा कंपनीकडे दिली जाईल, असे नितीन वैद्य यांनी सांगितले.