आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. आपल्य कर्तृत्वामुळे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या सन्मानासाठी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. एक मुलगी ही घराची शोभा असते, स्त्री गृहलक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावरील शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील निपुणतेने पार पाडत असते. त्यामुळे सर्वच क्षेत्राच स्वत: ला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांना लोकप्रिय कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच महिलांना सलामही केला आहे.
कलर्स मराठीवरील अनेक मालिका आज लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘घाडगे & सून’,’सुखाच्या सरींनी हे मन बावरे’,’राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमधील कलाकारांनी महिलांना शुभेच्छा दिला आहेत.

“स्त्रियांना व्यक्त होण्याचं, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कोणत्या गोष्टींना द्यायचं नाही हे त्यांना ठरवू दिलं पाहिजे. हे निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत. बुद्धी, भावना आणि जाणीव हे तिन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. या तिन्ही शब्दांच्या मागे असलेली जाणीव स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे ही जाणीव ज्यामध्ये उपजतच विकसित झालेली असते ती व्यक्ती म्हणजे स्त्री. स्त्रीयांमध्ये हे तिन्ही गुण उपजतच असतात. त्यामुळे त्या कोणत्याही जबाबदारी लिलया पेलताना दिसतात”, असं ‘घाडगे & सून’ या मालिकेतील अक्षय अर्थात चिन्मय उदगीरकरने म्हटलं.

अभिनेत्री भाग्यश्रीनेही तिचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. “स्त्री ही स्त्रीची शत्रू न बनता सखी होणे गरजेचे आहे ! “न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति” अशा विचाराचा समाज आज बदलत आहे. स्त्रीया घराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने पाऊल ठेवत आहे. सर्व क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या टप्प्यावर पुरुषही त्यांना बऱ्यापैकी सहकार्य करताना दिसत आहेत. पण बऱ्याचदा असं जाणवतं की, स्त्रियाच स्त्रियांचा अडसर बनत आहेत तिच्यावर अपेक्षांचं ओझं लादत आहेत. तिला समजून न घेता मानसिक छळवणूक करताना दिसतात. मला असं वाटत स्त्रियांनी स्त्रियांच्या मार्गात अडसर न बनता दिशादर्शक बनायला हवं. स्त्री ही अबला नाही, सबला आहे ती शांतादुर्गा आहे तशी प्रसंगी चंडिकाही होऊ शकते. ती समईतील सांजवात आहे तशी ती अन्याय झाल्यास मशालही होऊ शकते. म्हणूनच आज स्त्रीनं या सर्वांचा समतोल साधून सुजाण समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील रहायचं आहे. आणि हे तेंव्हाच शक्य होईल जेव्हा स्त्री ही स्त्रीची शत्रू न बनता सखी होईल”.

महिलांशिवाय पुरुषांना अस्तित्वच नाही असं ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने म्हटलं आहे. “आपल्याला घरात आई हवी असते, मायेने फुंकर घालायला बहिण लागते,तर प्रेमाने समजून घ्यायला पत्नी लागते. त्यामुळे आपल्या आयुष्यात महिलांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत”, असंही तो म्हणाला.

दरम्यान, ओमप्रकाशचीच री ओढत अर्चना निपाणकरनेदेखील स्त्रियांना सलाम केला आहे. “आज एक स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे असते. मग ते कुठलंही क्षेत्र असो. एका वेळी ती अनेक गोष्टी करू शकते आणि तीच खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्यही उत्कृष्ट प्रकारे सांभाळू शकते आणि त्याचा समतोल राखू शकते ह्यात काही वादच नाही. यावर्षात मी शहीद जवानांच्या घरातील स्त्रियांकडून एक गोष्ट शिकले. कठीण प्रसंगाला कसं सामोरं जावं हे या स्त्रियांकडून शिकण्यासारखं आहे”.