International Yoga Day 2018 बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात ताणतणाव वाढल्याचं पाहायला मिळतं. अशा वेळी सर्व परिस्थितीत शरीर आणि मनाला तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्याचा मार्ग म्हणजे ‘योग’. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून, भारताने ही संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. आज भारतातच नव्हे तर अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देशात योगासनं करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर योगाभ्यासामुळे तिच्या जीवनात कशाप्रकारे आमूलाग्र बदल झाले ते सांगत आहे.

अमृता खानविलकर-

कोणाही अभिनेत्याचं आयुष्य हे नेहमीच धकाधकीचं असतं. अनेक गोष्टी करताना त्यातून असंख्य गोष्टी शिकायला मिळतात. ‘नच बलिये’ जेव्हा सुरू होतं त्या वेळेस मला खूप वेगवेगळे डान्स फॉर्म शिकायला मिळाले आणि मला त्याची आवड होती, पण त्यानंतर माझे आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न सुरू झाले. मग मी वेगवेगळ्या डॉक्टरकडून सल्ले घ्यायला लागले. वर्षभरात मी चार वेळा हॉस्पिटलला गेले आणि एका पॉइंटनंतर मी ठरवलं मी अॅलोपॅथी घेणारच पण तरीदेखील मी माझ्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे त्रस्त होते. पण असं म्हणतात ना आपल्याला जे हवं असतं ना त्यासाठी नेहमी एखादा मार्ग असतो, पण तो शोधावा लागतो. अचानक मला होमिओपॅथी डॉक्टर मिळाली. तिने मला औषधोपचार करून मानसिकदृष्टय़ा कणखर बनवलं आणि मला जाणवलं की आता मला स्वत:कडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे.

आपण नेहमी बाकीच्या गोष्टींकडे बघत असतो, पण मनातली ताकद ओळखायला वेळ लागतो. मग मी ठरवलं की आपल्यासाठी योगाभ्यास उत्तम आहे आणि मग हळूहळू आपोआप गोष्टी बदलायला लागल्या. माझ्या आयुष्यात मला खूप धडे शिकावे लागले. मी खूप हट्टी होते, रागीट होते, पण याच सगळ्याचा मला त्रास होत होता. जेव्हा मी आनंदात राहायला पाहिजे होतं तेव्हा मी रागवायचे. खूप नकारात्मक गोष्टींचा विचार करायचे. मग मी स्वत:ला समजावलं की मला रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. कारण राग माझ्या विकासावर परिणाम करत होता आणि हे मला जाणवलं होतं. म्हणून मी योगाभ्यास सुरू केला. योगामुळे मी हळूहळू स्वत:वर संयम ठेवायला शिकले. अगोदर काही दिवस मला स्वत:वर अजिबात संयम ठेवायला जमत नव्हतं. पण पाण्यात पडल्यावर हातपाय तर हलवायला लागणारच होते, म्हणून मी अगोदर पाच मिनिटं ध्यानसाधना करायला सुरुवात केली, पण त्यातही सुरुवातीला मी रडायचे. पण याच पाच मिनिटांची सात मिनिटं कशी झाली ते माझे मलाच समजले नाही. आता मी २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ध्यानसाधना करू शकते. ते म्हणतात ना आपण जसजसा स्वत:चा शोध घेतो तसा आपल्यातील खजिना आपल्याला गवसतो! योगसाधनेमुळे मी आतापर्यंत खूप गोष्टी शिकले आणि अजून पुढेदेखील शिकायला मिळतील, याची मला खात्री आहे.