रेश्मा राईकवार

गोविंदा आणि चंकी पांडे या दोन अभिनेत्यांचा इंडस्ट्रीत प्रवेश झाला तेव्हा त्यांच्या आजूबाजूला प्रस्थापित कलाकारांचं मोठं प्रस्थ होतं आणि त्या वेळी मल्टिकास्ट चित्रपटांची एकच लाट आली होती. १९८७ साली चंकी पांडे यांनी पहिला हिंदी चित्रपट केला होता, ‘आग ही आग’. त्या वेळी ‘पाप की दुनिया’, ‘विश्वात्मा’, ‘तेजाब’, ‘खतरों के खिलाडी’ असे कितीतरी चित्रपट चंकी पांडेने केले खरे.. मात्र यात कुठेही हिरो म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख त्याला निर्माण करता आली नाही. त्यातही आमिर, शाहरूख ही नवी लाट अशी आली की यात बाकीचे सगळे दूर फेकले गेले. तरीही इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशी चित्रपटांचा हिरो म्हणून तिथे नावलौकिक कमावले, मात्र त्या वेळी मायदेशात एक पूर्ण पिढी आपल्याला विसरली आहे या भावनेने अस्वस्थ होऊन पुन्हा बॉलीवूडमध्ये परतलेल्या ‘आखरी पास्ता’शी मारलेल्या गप्पा..

समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या मराठी चित्रपटातून चंकी प्रेक्षकांसमोर आला आहे. इतक्या वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करण्याचे कारण काय.. असे विचारल्यावर मराठी चित्रपटांविषयी ऐकून होतो, पण त्याची फारशी कल्पना नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी चित्रपटांविषयी विचारणाही झाली होती, मात्र इथे काम करायचं तर काहीतरी मोठंच करायचं असं मनाशी पक्कं होतं. आणि ती संधी समीर पाटील यांच्या ‘विकून टाक’ने दिली, असे त्यांनी सांगितले. खरंतर मला मराठी चित्रपटात मराठी भाषेत संवाद म्हणत काम करायचं होतं, मात्र इथे माझ्या वाटय़ाला फारसे मराठी संवाद नाहीत, कारण मी एक अरबी व्यक्तिरेखा साकारली आहे, असं ते गमतीने सांगतात. चंकी पांडे हे नाव आता पुन्हा एकदा ‘हाऊसफुल्ल ४’, ‘साहो’ सारख्या चित्रपटांमुळे घराघरांत पोहोचलं आहे. पण एक काळ होता जेव्हा सगळे आपल्याला विसरले होते, असं ते म्हणतात.

मी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा मल्टिस्टार चित्रपटांचाच ट्रेण्ड होता. एकतर त्या वेळी फारशी चित्रपटगृहे नव्हती, त्यामुळे कलेक्शनही मर्यादितच असायचे. त्या वेळी खरंतर आम्ही खूप काम करत होतो, पण कितीही काम केलं तरी ओळख निर्माण करण्यासाठी ते काम कमीच पडतं आहे, असं वाटायचं. आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. समाजमाध्यमांमुळे जग फार जवळ आलं आहे आणि तुम्ही के लेलं चांगलं-वाईट काम सहज लोकांपर्यंत पोहोचतं, असं ते सांगतात. १९९३ साली ‘आँखे’ प्रदर्शित झाला त्यानंतर माझ्याकडे अजिबातच काम नव्हतं. हिरोचा भाऊ, मित्र असं काहीच नव्हतं. त्याही वेळी मी चित्रपट केले पण तो काळ खूप संघर्षांचा होता, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी त्यांना बांगलादेशी चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा झाली आणि त्यांनी तिथे शिरायचा निर्णय घेतला. आपला देश, भाषा सोडून वेगळ्याच ठिकाणी पाय रोवणं सोपं नव्हतं. एकतर भाषेची काहीच कल्पना नव्हती म्हणजे निदान मला मराठी भाषा येते. मी खूप वर्ष मुंबईतच राहिलेलो आहे. पण तिथे मला भाषा, संस्कृती सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. अभिनयाने मात्र आपल्याला तिथे तारलं, असं ते म्हणतात. पाच वर्ष तिथे होतो, मग मात्र जाणवलं की लोक आपल्याला विसरले आहेत. आता लोकांना पुन्हा एकदा चंकीची ओळख करून द्यायला हवी. त्यासाठी इथे आल्यानंतर काही वेगळ्याच व्यक्तिरेखा स्वीकारत गेलो, जेणेकरून त्या भूमिका लांबीने छोटय़ा असल्या तरी लोकांच्या लक्षात राहतील. ‘हाऊसफुल्ल’मधला आखरी पास्ता ही त्यातली एक व्यक्तिरेखा होती, असं ते सांगतात.

हिंदी चित्रपट आता कमालीचा बदलला आहे, मराठी चित्रपटातही खूप मोठे बदल झाले आहेत. पण मल्टिस्टारर चित्रपट हे अजूनही हिंदीत नावाजले जातात. अशा चित्रपटांमध्ये काम करायची मजाच वेगळी आहे, असं ते म्हणतात. हाऊसफुल्ल चित्रपट मालिकेचंच उदाहरण घ्यायचं तर अक्षयकुमार, रितेश देशमुख हे कमालीचे कलाकार आहेत. आणि वेगवेगळी ऊर्जा, अभिनय शैली असलेले कलाकार जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्यात होणारी देवाणघेवाणही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते, असे सांगणाऱ्या चंकी पांडे यांनी ‘साहो’च्या निमित्ताने पहिल्यांदाच खलनायकी भूमिका साकारली, त्याहीआधी त्यांनी ‘बेगम जान’ चित्रपटात खलनायक साकारला होता. खलनायक साकारणं आपल्यासाठी अवघड आहे, असं ते सांगतात. मुळात दिग्दर्शकाने माझा खलनायक म्हणून विचार केला हीच गोष्ट माझ्यासाठी वेगळी होती. मी नेहमीच नकारात्मक विचारांपासून दूर राहतो, त्यामुळे भूमिकेपुरती का होईना हे विचार मनात रुजवणं माझ्यासाठी क्लेशदायक ठरतं. पण कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका करून पाहायच्या आहेत त्यामुळे याही भूमिका मी आवर्जून करतो आहे, असे त्यांनी सांगितले.

‘आखरी पास्ता’ मी नव्हतोच!

अ‍ॅम अ जोकिंग.. म्हणत येणारा कलरफुल कपडय़ातला आखरी पास्ता हा आता लहान मुलांच्याही आवडीचा झाला आहे. मात्र ही व्यक्तिरेखा सुरुवातीला दुसरंच कोणीतरी करणार होतं, असं ते म्हणतात. साजिद खान यांनी हाऊसफुल्लचं दिग्दर्शन केलं आहे आणि सुरुवातीला ही भूमिका त्यांनीच करावी, असं सगळ्या कलाकारांचं म्हणणं होतं. त्यांनाही त्यासाठी दुसरा पर्याय मिळाला नव्हता. एकदा साजिद घरी आल्यानंतर आमच्याशी गप्पा मारत असताना त्याने या भूमिकेविषयी सांगितलं आणि माझ्या पत्नीने त्याला माझं नाव सुचवलं. त्यालाही ती कल्पना पसंत पडली आणि मी आखरी पास्ताच्या अंतरंगात शिरलो, असं ते सांगतात.