बॉलिवूड अभिनेता इरफान खान नेहमीच त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. ज्या सिनेमात तो असतो त्यातल्या भूमिकेला तो १००% देण्याचा प्रयत्न करतो. आता तो होमी अडाजनिया यांच्या आगामी ‘तकादूम’ या सिनेमात एक मजेशीर भूमिकेत दिसेल. विशेष म्हणजे त्याची ही भूमिका एका प्रसिद्ध रॉकस्टारच्या जीवनावर आधारित आहे. सध्या तो या भूमिकेसाठी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व परिणीती चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.
आतापर्यंत इरफान खानने आपल्या चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या आहेत. आता तो आगामी ‘तकादुम’ या चित्रपटात रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूत याची ‘तकादुम’मध्ये प्रमुख भूमिका असून त्याला संगीतकार व्हायचे आहे. तो एका रॉकस्टारचा चाहता आहे. त्याला त्याच्यासारखे बनायचे आहे आणि या रॉकस्टारची भूमिका इरफान खान साकारणार आहे. त्याची ही भूमिका मिक जॅगर व जॉन लेनॉन या प्रसिद्ध रॉकस्टारच्या आयुष्यावर प्रेरित आहे.
सध्या तो या भूमिकेसाठी चांगलीच मेहनत घेत असून मिक व जॉन यांच्या जीवनाबद्दल माहिती गोळा करीत आहे. रॉकस्टारच्या भूमिकेसाठी त्याला आपल्या लूकमध्येही बरेच बदल करावे लागले आहेत. विशेष म्हणजे ‘तकादुम’मध्ये दिसणारा त्याचा लूक आतापर्यंत एकाही चित्रपटात दिसलेला नाही. यामुळे तो ही नवीन व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फार उत्सुक असल्याचं कळत आहे.
बॉलिवूडमध्ये आपला वेगळी ओळख तयार केल्यावर इरफानने अनेक हॉलिवूडपटात काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांच्या ‘इन्फर्नो’ या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो टॉम हॅक्ससोबत दिसला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 8:38 pm