उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन, दर्जेदार अभिनय, उत्तम पटकथा आणि योग्य दिग्दर्शन यांच्या जोरावर २००९ साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ हा चित्रपटाची सिनेमासृष्टीत आजवर प्रदर्शित झालेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये गणना होते. २,७८८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या या लोकप्रिय चित्रपटाने थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलून टाकला.

या चित्रपटानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये अवतार-२ बाबत चर्चा सुरू झाली. हा चित्रपट केव्हा येणार, त्यातील कथानक काय असणार अशा विविध चर्चा प्रेक्षकामध्ये रंगत होत्या. सध्या चाहते ‘अवतार २’ची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी केलेल्या विधानामुळे या चित्रपटाच्या चाहत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.  अवतार २ चित्रपट येणार असून त्यावर काम सुरू असल्याचं कॅमरुन यांनी स्पष्ट केलं आहे. ‘सध्या टर्मिनेटर: द डार्क फेट या चित्रपटाच्या प्रकल्पात गुंतल्यामुळे ‘अवतार’ चित्रपट सध्यातरी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकत नाही, ‘अवतार -२’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे सांगत त्यासाठी तेवढीच चांगल्या पटकथा लेखनाची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. एका मोठय़ा संशोधन प्रकल्पाप्रमाणे असलेल्या या चित्रपटात अ‍ॅनिमेशन आणि कलाकारांचे पोशाख यासाठी रिचर्ड अ‍ॅलोंझो, मिचेल बार्बर, जिल क्रोमॅक, लिंडा डेवेट्टा, जेम्स हॉनर, कॉलिन विल्सन यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी आपल्या कल्पनाशक्तीची परिसीमा गाठली होती. आता दुसऱ्या भागात त्याहून भव्यदिव्य असे काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चित्रपट पाहताना  प्रेक्षक त्याची तुलना नेहमी पहिल्या भागाशी करतात त्यामुळे दिग्दर्शक म्हणून खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे कॅमरून यांचे म्हणणे आहे.

२१५४ सालापर्यंत पृथ्वीवरील सर्व खनिजसंपत्तीचा उपभोग मानवाने घेतला असून आता त्याला नवीन ऊर्जासाठय़ाची गरज आहे. संशोधन करून मानव ‘पँडोरा’ नामक ग्रहावर पोहोचतो. तेथील अफाट खनिज संपत्ती पाहून त्या ग्रहावर कब्जा करण्याचा विचार त्याच्या मनात येतो. त्यासाठी मानवाने सुरू केलेले प्रयत्न आणि त्या ग्रहावरील रहिवाशांनी मानवजातीला केलेला विरोध दरम्यान त्यांच्यात झालेले युद्ध या अभिनव कथेवर आधारलेला ‘अवतार’ प्रेक्षकांना खूप आवडला होता.