भाजपाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलेल्या जावईशोधाचं चांगलंच हसू झालं आहे. महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा त्यांनी केला होता. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या, असंही त्यांनी म्हटलं होतं. देब यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देब यांची पाठराखण करत खिल्ली उडवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले की, ‘महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा करणाऱ्या त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही खिल्ली का उडवत आहात? खिल्ली उडवणाऱ्यांनी स्वत:च्या धार्मिक श्रद्धांविषयीसुद्धा तटस्थ दृष्टीकोनातून पाहावं. जगातल्या कोणत्याही धर्माच्या श्रद्धा आणि समजुती, या व्यक्तीच्या (त्रिपुराचे मुख्यमंत्री) श्रद्धेइतक्याच तर्कशुद्ध आणि रास्त आहेत.’

त्रिपुराच्या राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांचं मत बरोबर असल्याचा अभिप्राय दिला. ‘पुराणाच्या काळात असलेल्या स्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी नोंदवलेलं निरीक्षण वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिव्य दृष्टी, पुष्पक रथ इत्यादी कल्पना प्रत्यक्षात जमिनीवर काही असल्याशिवाय सुचणं अशक्य आहे. त्यामुळं कुठल्या तरी प्रकारचं ज्ञान त्याकाळी असणार,’ असं रॉय यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं.