सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सहज व्यक्त होण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. मात्र त्याचसोबत ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलं आहे. या ट्रोलिंगवर अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंगला भीक न घालता व्यक्त होत रहावं, असं त्याने म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

कलाकारांच्या ट्रोलिंगवरून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक ट्विट केलं होतं. ‘ट्विटरकरांनी आता कुठल्याही कलाकारांनी त्यांची मते, अभिप्राय, भावना इ. समाज माध्यमांवर व्यक्त करावी अशी अपेक्षा करणं थांबवावं. कारण त्या मतांचं आदर करणं आपल्याला जमणार नाहीच. कलाकार व्यक्त होत नाही म्हणून आणि मग व्यक्त झाले तरीही ट्रोलिंग हे सुरूच राहतं’, असं तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

सोनालीच्या या ट्विटला अनुसरून जितेंद्रनेही ट्रोलिंगवर त्याचं मत मांडलं. ‘मतांचा आदर करणं फार पूर्वीच थांबलं. जिथे आज माणसं थोरामोठ्यांना, महापुरुषांना सोडत नाहीत, लतादीदींना ट्रोल करतात. तिथे सर्वसामान्य कलाकाराची काय बिशाद! असो.. एकतर हे माध्यम सोडून द्यावं अन्यथा ट्रोलिंग ला भीक न घालता व्यक्त होत रहावं’, असं त्याने ट्विटरवर लिहिलं.

आजवर अनेक कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. फोटो, व्हिडीओ किंवा एखाद्या विषयावरून मांडलेलं मत यावरून अनेक कलाकार ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत.