अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात आयुषमान खुराना आणि अमिताभ यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हा आगामी चित्रपट सुरुवातीपासूनच वादात राहीला आहे. आधी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार म्हणून सिनेगृहांच्या मालकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अन् आता पटकथा चोरीचे आरोप केले जात आहेत. ‘गुलाबो सिताबो’ची पटकथा लेखिका जूही चतुर्वेदी यांनी लिहिली आहे. त्यांच्यावर अकीरा अग्रवाल यांनी पटकथा चोरीचे आरोप केले आहेत.

अवश्य पाहा – सर्वाधिक कमाई करणाऱ्या २० सेलिब्रिटींच्या यादीत केवळ एक भारतीय

अकीरा दिवंगत लेखक राजीव अग्रवाल यांचे पुत्र आहेत. २०१८ साली राजीव अग्रवाल यांनी ‘सिनेस्तान इंडियाज स्टोरीटेलर स्क्रिप्ट कंटेस्ट’ या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन स्क्रीन राइटर्स असोसिएशन या संस्थेनं केलं होतं. या स्पर्धेसाठी राजीव यांनी एक पटकथा पाठवली होती. या पटकथेची चोरी जूही चतुर्वेदी यांनी केली आहे. जूही या स्पर्धेत परिक्षक होत्या. त्यामुळे या पटकथेची चोरी करणं त्यांना सोप झालं. असा आरोप अकीरा अग्रवाल यांनी केला आहे.

अवश्य वाचा – “आधी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती थांबवा”; अभय देओलची भारतीय कलाकारांवर टीका

अकीरा अग्रवाल यांचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जूही चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. राजीव अग्रवाल यांनी लिहिलेली पटकथा ‘गुलाबो सिताबो’च्या कथेची मिळती जुळती आहे. लेखिकेने कुठलीही परवानगी न घेता चित्रपटात या कथेचा वापर केला. त्यांच्याकडे याबाबत सबळ पुरावे आहेत. अन् आता ते कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट येत्या १२ जूनला अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.