‘रईस’च्या तोडीने मदानात उतरलेला हृतिक रोशन आपल्या सगळ्या कलागुणांनी प्रेक्षकांना आपण ‘काबिल’ आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र चित्रपटात कथेला फारसा वावच नसल्याने एकटय़ा हृतिकच्या काबिलियतवर चित्रपटाची नय्या पार लागली आहे. एरव्ही अ‍ॅक्शनपटांमध्ये माहिर असलेले दिग्दर्शक संजय गुप्ता या चित्रपटासाठी फारच कमी पडले आहेत. चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ही हास्यास्पद असल्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट एखाद्या सेटवर घडवून आणला जात असल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.

‘काबिल’ सुरू होतो तो आंधळा असला तरी डोळस माणसालाही लाजवेल इतका प्रत्येक कामात कुशल असलेल्या रोहनपासून.. पहिल्या काही फ्रेम्सनंतर रोहन (हृतिक रोशन) त्याच्याप्रमाणेच दृष्टिहीन असलेल्या सुप्रियाला (यामी गौतम) भेटतो. दोघांमध्येही एकच कमीपणा आहे त्यामुळे अशा दोन व्यक्ती एकत्र येऊन चांगलं सकारात्मक विश्व उभं करू शकत नाही, हा सुप्रियाचा विश्वास असतो. आपल्या प्रेमाच्या आणि कौशल्याच्या बळावर रोहन सुप्रियाच्या या अंधविश्वासाची मोडतोड करतो आणि हे दोघेही विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात करतात. चित्रपटाचा पूर्वार्ध हा या जोडप्याच्या प्रेमकथेचा आहे. पण हृतिक आणि यामीमधली प्रेमकथा आपल्यावर फारसा प्रभाव पाडत नाही. किंबहुना, ते जोडपं म्हणून आपल्यासमोर येईपर्यंत त्यांच्या आयुष्यात दिग्दर्शकाने ठरवलेल्या नष्टचक्राला सुरुवात झालेली असते. त्यानंतर उत्तरार्धात रंगतं ते ‘काबिल’ सूडनाट्य..

पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात चित्रपट जास्त पकड घेतो. आपल्या पत्नीला वाचवू न शकलेला, पोलिसांकडूनही हार खाल्लेला रोहन आंधळा असूनही केवळ आपल्या हुशारीच्या बळावर आपल्या सुखी संसाराला चाड लावणाऱ्यांचा खात्मा करतो, ही जुनीच गोष्ट चित्रपटात पाहायला मिळते. मात्र इथे कशा पद्धतीने रोहन त्यांना जेरीस आणतो हा भाग पडद्यावर पाहणे रंजक ठरले आहे. दिग्दर्शक म्हणून अ‍ॅक्शनपटांवरची संजय गुप्तांची पकड उत्तरार्धातील या भागावरून दिसते. रोहन आंधळा असल्याने त्या भूमिकेत हृतिक असला तरीही तो सुपरहिरोसारखा एकेकाला ठार मारू शकत नाही, याचं भानही दिग्दर्शकाने ठेवलं असल्याने चित्रपटाची मांडणी अवास्तव वाटत नाही. हृतिक त्याच्या नेहमीच्या अ‍ॅक्शनपटांपेक्षा या चित्रपटात वेगळा वाटतो. त्याची देहबोली आजवरच्या त्याच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. इथे तो फिट आणि मॅचोमॅन रूपात आपल्याला दिसत नाही. त्यामुळे केवळ बुद्धीच्या जोरावर आपल्या शत्रूला संपवण्याचा त्याचा खेळ पडद्यावर छान रंगला आहे. यामी गौतमला चित्रपटात फारसे काही करण्यासारखे नाही. खरं म्हणजे चित्रपटात रोहित रॉय, रोनित रॉय हे संजय गुप्तांचे हुकुमी एक्केआहेत. नरेंद्र झा आणि गिरीश कुलकर्णीही आहेत. मात्र चित्रपटभर आपल्याला फक्त आणि फक्त हृतिकच लक्षात राहतो. ‘काबिल’ची एक-दोन गाणी चांगली आहेत. पण संपूर्ण चित्रपट हा फक्त हृतिकनेच उचलून धरला आहे हेही तितकेच खरे आहे.

काबिल

निर्माता – राकेश रोशन

दिग्दर्शक – संजय गुप्ता

कलाकार – हृतिक रोशन, यामी गौतम, गिरीश कुलकर्णी, नरेंद्र झा, रोहित रॉय, रोनित रॉय.