दिग्दर्शक मकरंद माने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रिंगण’, ‘यंग्राड’ या चित्रपटानंतर नवा चित्रपट घेऊन येत आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ निर्मित आणि व्हायकॉम १८ स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे “कागर”! २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाविषयीचे काही अनुभव सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी शेअर केले. ‘चित्रपटाची निर्मिती करणं आणि चित्रपटासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत’, असं त्यांनी सांगितलं.

“मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करणं, एक निर्माता म्हणून नाव कमाविण्याची इच्छा असणं आणि ती इच्छा पूर्ण करणे किंवा पूर्ण होणे यामध्ये बरेच अंतर असते. चित्रपटाची आर्थिक जबादारी घेणे आणि ती पूर्ण करतांना त्यातील व्यवसायाचे बारकावे जाणून घेणे आणि पुढे जाणे हे महत्वाचे आणि गरजेचे असते. निर्माता आणि फायनान्सर यात फरक असतो हा पहिलाच धडा आम्हाला मिळाला, असं कागर चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “चिडीया या पाहिल्या हिंदी चित्रपट निर्मितीचा एक सशक्त अनुभव घेऊनच मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘चिडीया’ हा चित्रपट सध्या सर्व फेस्टिवलमधून प्रदर्शित होतोय आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरण्यात चित्रपटाला यश मिळत आहे. पण पुढे सुद्धा निर्मिती करायचीच या ध्यासाने मराठी कथेचा शोध सुरू ठेवला आहे”.

दरम्यान, आपल्याला आवडेल ती कथा निवडायची आणि कथेला न्याय मिळेल ते बजेट ठेवायचे या निर्णयाने सुधीर कोलते आणि विकास हांडे या दोघांनी ‘उदाहरणार्थ’ या बॅनरची स्थापना केली .

“कागर” आणि “चिडीया” या नंतर पुढे काय?”

पुढे मराठी चित्रपटाचे विषय निवडले असून त्यावर जोमाने काम सुरू आहे” वास्तवाचे व्यावसायिक भान ठेवून “उदाहरणार्थ” चे काम सुरू आहे . “कागर” नंतर “चिडीया” या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. या निमित्ताने कोलते आणि हांडे या दोन व्यावसायिकांच्या सहकार्याने मराठी चित्रपट निर्मितीला भक्कम निर्माता मिळाला हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.