दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काजल बॉलिवूडमध्ये देखील अतिशय लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच तिने लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. आता काजलने पहिल्यांदाच पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नुकताच काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणारा पती व्यावसायिक गौतम किचलूसोबतचा फोटो शेअर केला आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी काजल लग्नबंधनात अडकणार असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. तिने लग्नसोहळ्याचे काही मोजक्याच लोकांना आमंत्रण दिले आहे.
काजलने दसऱ्याच्या दिवशी पतीसोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. आता चाहत्यांमध्ये काजलच्या लग्नाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
काजल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. त्यामधील ‘मगधीरा’ या चित्रपटाने काजलला लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. नंतर काजलले बॉलिवूडमधील ‘सिंगम’ चित्रपटात अजय देवगणसोबत काम केले. ‘स्पेशल २६’, ‘क्यूं! हो गया ना’ या चित्रपटातही तिने काम केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 1:10 pm