करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूची निर्मिती चीनमधील वुहान येथे झाली होती. आज या विषाणूचा फैलाव संपूर्ण जगात झाला आहे. जगभरातील हजारो लोकांनी या विषाणूमुळे आपले प्राण गमावले आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावासाठी अभिनेता कमाल खानने चीनमधील खाद्य संस्कृतीला दोषी ठरवले आहे. आता तरी उंदीर, मांजर खाणं बंद करा असा सल्ला त्याने चिनी नागरीकांना दिला आहे.

काय म्हणाला केआरके?

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने करोनाच्या निमित्ताने चिनी खाद्य संस्कृतीवर निशाणा साधला आहे. “चिनी लोकांमुळे निर्माण झालेल्या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. मी चिनी लोकांना विनंती करु इच्छितो की, आता तरी उंदीर, मांजर, साप, विंचू, पाल, कुत्रा खाणं कृपया थांबवा. आमच्यावर फारच उपकार होतील.” असं ट्विट केआरकेनं केलं आहे.

करोना व्हायरसमुळे चिनी लोकांच्या खाद्य संस्कृतीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमाल खानच्या ट्विटचे समर्थन करत त्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे.