दिलीप ठाकूर
कमल हसनच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक महत्त्वपूर्ण म्हणजे, तो पटकथेनुसार रुप धारण करतानाच छान चकमा देतो. ‘अप्पू राजा’मध्ये त्याने बुटका साकारत अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. तसेच त्याचे ‘हिन्दुस्तानी’ (१९९६)  मधील हे जख्खड म्हातार्‍याचे रुप. दक्षिणेकडील चित्रपटाचा हुकमी मसाला कायम ठेवूनच देशभक्तीवरचा हा चित्रपट सर्वप्रथम तमिळ भाषेत ‘इंडियन’ नावाने निर्माण झाला. तेलगूत तो डब करताना त्याचे नाव ‘भारतीयेडू’ असे केले. अशा दोन भाषेत सुपर हिट ठरवल्यावर हाच चित्रपट हिंदीत डब होणे स्वाभाविक होतेच. ते ‘हिन्दुस्तानी’ झाले. असा हा एका भाषेतील चित्रपट इतर भाषेत डब वा रिमेक झाल्याने चांगले चित्रपट अन्यभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. दक्षिणेकडील चित्रपटाच्या या खास वैशिष्ट्याने कमल हसन, रजनीकांतचे अनेक चित्रपट आपण पाहतोय.

‘हिन्दुस्तानी’  या नावावरुन त्याचे प्रदर्शनही स्वातंत्र्य दिनाच्या आसपास करण्याची व्यावसायिक हुशारी निर्माते ए. एम. रत्नम व जामु सुगंध यानी केली. (२२ ऑगस्ट)  आणि गल्लापेटीवर यशही मिळवले. तेच तर अशा चित्रपट निर्मितीमागची धोरणे योग्य असल्याचे स्पष्ट करते. दिग्दर्शक शंकर हा प्रेक्षकांची नाडी ओळखणारा म्हणूनच गणला गेला. ‘हिन्दुस्तानी’मध्ये तात्कालिक काळातील भष्टाचारावर प्रहार करताना आता वयोवृद्ध असणार्‍या चंद्रा बोस अर्थात चंद्रू स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत होते असा संदर्भ दिला. (कमल हसन दुहेरी भूमिकेत).

मनिषा कोईराला आणि पाहुणी कलाकार उर्मिला मातोंडकर अशा हिंदीतील दोन नायिकांमुळे या चित्रपटाची हिंदी डब आवृत्ती ओळखीची ठरली. दक्षिणेकडील सुकन्या ही तारकाही यात होती. उर्मिलाचे ‘लटका दिखा दिया तुमने…’ भारी लोकप्रिय ठरले. ए. आर. रहमानच्या संगीतातील याबरोबरच ‘टेलिफोन धून से…’, ‘माया मच्छिंद्र’, ‘प्यारे पंछी’ ही गाणी लोकप्रिय ठरली. मूळ तमिळ चित्रपटाच्या गाण्यांवरचं ही गाणी रचताना पडद्यावरील लिप मूव्हमेंट लक्षात घेऊन गाण्याचा मुखडा, अंतरा रचणे सोपे नसते.

‘हिन्दुस्तान’ लक्षात राहिलाय तो कमल हसनच्या वृध्दाच्या गेटअप व व्यक्तिरेखेने. कमल हसनच असे काही करण्यास धजावतो हा त्याच्यावरचा विश्वास अशा वेळेस अधोरेखित होतो.