‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कंगना रणौत आणि काही पत्रकारांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता कंगनाने आणखी एक व्यक्तव्य करत या वादाला नव वळण दिलं आहे. ‘मुंबईमध्ये पत्रकारांवर मुव्ही माफियांचा कंट्रोल आहे’, असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे ‘मुव्ही माफिया’ म्हणत तिने अप्रत्यक्षपणे चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि हृतिक रोशन यांच्यावर निशाणा साधला आहे.

“हिंदी चित्रपटसृष्टीत माध्यमांचा एक गट तयार झाला आहे. या गटावर मुव्ही माफियांचं नियंत्रण आहे. पत्रकारांनी एखाद्या गोष्टीचं निरिक्षण करावं, हे निरिक्षण केल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी खटकल्या त्यावर त्यांनी त्यांचं मत स्पष्टपणे मांडावं, निंदाही करावी. त्यांच्या अशा कामाचं मी मनापासून कौतुक करते. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे मला माझी चूक समजते आणि आयुष्यात स्वत:ला पुढे जाण्याची, कामात आणि अभिनयात पुढे येण्याची संधी मिळते”, असं म्हणत कंगनाने तिचा राग व्यक्त केला आहे.

पुढे ती म्हणते, “कलाविश्वामध्ये काही मुव्ही माफिया आहेत जे तुम्हाला एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपट मिळवून देण्यास मदत करतात आणि त्या बदल्यात तुमच्या कमाईतील २० ते ३० टक्के हिस्सा मागतात. कलाविश्वात मी स्वत:च स्थान स्वत: निर्माण केलं आहे. त्यामुळे माझ्या कमाईतील भाग मी त्यांना देऊ शकत नाही. तसंच हेच मुव्ही माफिया काही पत्रकारांच्या गटावर नियंत्रण ठेवतात”.

दरम्यान, ‘जजमेंटल है क्या’च्या पत्रकार परिषदेमध्ये कंगनाचा काही कारणामुळे एका पत्रकाराशी वाद झाला होता. या वादानंतर ‘Entertainment Journalist Guild of India’ने या प्रकरणी कंगनाने पत्रकारांची माफी मागावी असं म्हटलं होतं. कंगनाने असं न केल्यास तिचा चित्रपट बॉयकॉट केला जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर निर्माती एकता कपूरनं यावर माफी मागितली होती. मात्र कंगनाने मला खुशाल बॅन करा, मी अशा धमक्यांना घाबरत नाही असं म्हटलं होतं.