बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहिणी रंगोली चंडेल गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे. ‘बागी 3’ चा दिग्दर्शक अहमद खानने कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाविषयी काही प्रश्न उपस्थित केले. तेव्हापासून रंगोली आणि अहमदमध्ये ट्विटरवर वाद सुरु आहे. यामध्येच आता रंगोलीने अहमदला ओपन चॅलेंज देत, ‘तू यापेक्षा चांगला चित्रपट काढून दाखव’, असं म्हटलं आहे.

”मणिकर्णिका प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्याविषयी बऱ्याच नकारात्मक चर्चा रंगल्या होत्या. काही अफवाही पसरल्या होत्या. मात्र हे सारं असं असतानादेखील या चित्रपटाने पहिल्या विकेंडचा ४५ कोटी रुपयांचं बॉक्स कलेक्शन केलं होतं. परंतु अहमद खानचा ‘बागी 3’ हा बिग बजेट चित्रपट असूनदेखील त्याला विकेंडला चांगली कमाई करता आली नाही”, असं रंगोलीचं म्हणणं आहे.

“अरे..खानभाई १५५ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटाला तू फ्लॉप म्हणतोस. तुझ्या बागी 3ने विकेंडला फक्त ४९ कोटी रुपयांचीच कमाई केली. हे काही योग्य नाही. सध्या तुझे खराब दिवस सुरु आहेत”, असं रंगोली म्हणाली.

पुढे ती म्हणते, कलाविश्वातील कोणतीही अभिनेत्री ६०-१०० कोटी रुपयांच्या चित्रपटाची जबाबदारी घेऊ शकत नाही. पण कंगनाने एकमेव अशी आहे जी तिच्या हिमतीवर अशा चित्रपटाची निर्मिती करु शकते आणि जर तिच्यासारखं कोणी असेल तर सांगा, कंगना अभिनय सोडून देईल.

वाचा : ‘चला हवा येऊद्या’फेम या अभिनेत्याला ओळखलंत का?

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये अहमद खानने ‘मणिकर्णिका’विषयी त्याचं मत मांडलं होतं. या चित्रपटाची चांगल्या बजेटमध्ये निर्मिती केली होती. परंतु तो फ्लॉप झाला. निर्मात्यांना चांगलाच तोटा सहन करावा लागला. त्यामुळेच कंगनाचा आगामी ‘धाकड’ हा चित्रपटही अपयशी ठरला, असं अहमद यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर अहमद यांनी कंगनाला फोन करुन तिची माफीही मागितली होती.