काही महिन्यांपूर्वी बीबीसी वाहिनीवरील ‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा कार्चक्रम खूप गाजला होता. केवळ एक स्मार्टफोन घेऊन स्पर्धकांना जंगलात पाठवले जात असे. या ठिकाणी केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागायचे, अशा मध्यवर्ती थीमवर हा शो आधारित होता. लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या शोच्या भारतीय व्हर्जनमध्ये प्रमुख चेहरा अर्थात सर्व्हायवर असेल वेब सीरिज फेम सुमित व्यास. शोमध्ये सुमितसोबत एक सेलिब्रिटी पार्टनर आहे, तो म्हणजे टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्रा. मात्र, या शोदरम्यान सुमित आणि करणमध्येच कडाक्याचं भांडण झालं आहे.

अरुणाचल प्रदेशच्या जंगलात हे दोघे शूटिंग करत होते आणि तिथल्या एका मठाजवळ पोहोचण्याचं आव्हान त्यांना देण्यात आलं होतं. सुमितने त्याच्या फोनमधील नकाशावरून रस्ता शोधण्यास सुरूवात केली आणि मठाकडे जाण्यासाठी दोन रस्ते असल्याचं त्याने करणला सांगितलं. नेमकं कोणत्या रस्त्यावरून जायचं यावरून दोघांचा वाद झाला. या वादानंतर दोघेही वेगवेगळ्या मार्गाने मठाच्या दिशेने जायला निघाले. करणने जो रस्ता निवडला होता, तेथून जो मठाकडे लवकरच पोहोचणार होता तर दुसरीकडे सुमित मात्र जंगलात रस्ता चुकला होता. आपण मठाजवळ पोहोचणार असल्याचं करणने सुमितला कळवलंच नाही. उलट सोशल मीडियावरून करणने आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती दिली.

PHOTOS : बिग बींच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंब मालदीवला रवाना

सर्व प्रयत्नांनंतर जेव्हा सुमित मठाजवळ पोहोचला तेव्हा करणने कशाप्रकारे गैरसमज पसरवला हे लक्षात आले. सुमितचाही राग अनावर झाला आणि त्याने करणला खडे बोल सुनावले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि अखेर शोच्या टीममधील इतरांना मध्यस्थी करावी लागली.