विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी चाहत्यांना नेहमीच ‘कपल गोल्स’ देण्यात अग्रेसर असते. सोशल मीडियावरील फोटो असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावताना असो, ‘विरुष्का’ सर्वांचं लक्ष वेधून घेते. आता ‘करवा चौथ’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या जोडीने चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. विवाहित स्त्रियांसाठी खूप खास असलेल्या ‘करवा चौथ’चा उपवास अनुष्कासोबतच विराटनेही केला आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी हा उपवास करतात. पण पत्नीसोबत विराटनेही हा उपवास केला असून आपण अनुष्काच्या प्रत्येक गोष्टीत तिच्यासोबत असल्याचा संदेश त्याने अप्रत्यक्षरित्या दिला आहे.

पती-पत्नीच्या नात्याला आणखी दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे व्रत महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. चंद्रदर्शन केल्यानंतर ‘विरुष्का’ने त्यांचा सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा फोटो : ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आता अशी दिसते

‘जे एकत्र उपवास करतात आणि हसतात,’ असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तर अनुष्कानेही तोच फोटो पोस्ट करत लिहिले, ‘माझा आयुष्यभरासाठीचा साथीदार आणि उपवासाच्या दिवशी माझ्यासोबत व्रत ठेवणारा जोडीदार!’ या फोटोत अनुष्काने लाल रंगाची साडी नेसली नसून सुवासिनीचा श्रृंगार केला आहे. तर विराटने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. ‘विरुष्का’च्या या सुंदर फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.