केरळ राज्य सरकाराने राज्यातील सिनेसृष्टीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बजेटपूर्वीच केरळ सरकारने चित्रपटांवरील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीतील सर्व कर माफ करण्यात येणार आहेत. केरळ सरकारने घेतलेल्या या निर्णयमामुळे सिनेसृष्टीत सध्या आनंदाचं वातावरण आहे.

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. हा आर्थिक फटका सिनेसृष्टीलादेखील बसला. त्यामुळे सिनेसृष्टीला दिलासा मिळावा यासाठी त्यांचा करमणूक कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कर कपातीसोबतच गेल्या वर्षी मार्चे ते यंदाच्या मार्चपर्यंत वीज शुल्कामध्येही ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधीची बैठक पार पडली. या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात देण्यात आलेल्या निवेदनानुसार, विजेच्या निर्धारित करण्यात आलेल्या शुल्कातही ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच चित्रपटगृहांवरील मालमत्ता कर मासिक हप्त्यांमध्ये जमा केला जाईल, असा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.