वरुण धवन, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिज यांच्या भूमिका असणाऱ्या ‘ढिशूम’या चित्रपटाचे पोस्टर आणि गाणी सध्या बरीच गाजत आहेत. परिणितीचा नवा लुक आणि त्यातही वरुण आणि तिची जोडी ‘जानेमन आ…’ या गाण्याला आणखीनच लोकप्रिय बनवत आहे. सध्या अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग असलेल्या या गाण्याचे चित्रिकरण सुरु असताना अचानक वरुणने गाण्याच्या शेवटी चुंबनदृश्य असावे असा सल्ला दिला. अर्थात ‘त्याने हा सल्ला दिला तेव्हा चित्रपटाचा दिग्दर्शक रोहीत धवन सेटवर उपस्थित नव्हता. किंबहुना गाण्याचे चित्रिकरण सुरु असताना शेवटी अचानकच वरुणने हा टेक दिला’, ज्यामुळे सेटवरचे सगळेच काही क्षणांसाठी थक्क होते, असा गौप्यस्फोट परिणिती चोप्राने एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना वरुण आणि परिणिती या दोघांनीही एकमकांच्या अभिनयाची बरीच प्रशंसा केली. चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसणाऱ्या परिणितीच्या भूमिकेबाबत उत्सुकता कायम राखत या दोघांनीही ही माहीती गुलदस्त्यातच ठेवली. बऱ्याच काळानंतर अभिनेता जॉन अब्राहम या चित्रपटाद्वारे दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. असा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ ढिशूम’ २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.