‘कोण होणार करोडपती’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वात काहीतरी नाविन्य पाहायला मिळतं. या पर्वातसुद्धा प्रेक्षकांसाठी, स्पर्धकांसाठी बऱ्याचशा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले.

यावेळी स्पर्धकांसाठी तीन लाइफलाइन असणार आहेत. एक्स्पर्ट अॅडव्हाइस (तज्ज्ञांकडून सल्ला), 50-50 (दोन अचूक पर्याय वगळले जातात आणि उरलेल्या दोन पर्यायांमधून उत्तर निवडायचे असते), ऑडियन्स ओपिनियन (कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा कौल घेतला जातो) असे हे तीन लाइफलाइन असतील. यासोबतच स्पर्धेत तीन लाख वीस हजारांहून अधिक रक्कम जिंकणाऱ्यांसाठी गुंतवणूक सल्लागार नेमण्यात आला आहे. जिंकलेल्या रकमेचं नेमकं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे ही रक्कम गुंतवण्यासाठी सल्लागारांकडून मदत करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात दर गुरुवारी कर्मवीर म्हणून विशेष भाग सादर होणार आहे. यात सामान्यांमध्ये राहून आपल्या कर्तृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या काही कर्मवीरांना ते सलाम करणार आहेत. येत्या २७ मे पासून सोनी मराठीवर रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.