‘कोती’चे निर्माते स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष पोटे यांचे मत

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही कित्येकदा तृतीयपंथीयांचा विषय मांडण्यात आला आहे. मात्र चित्रपटांतून आपल्याला त्यांचे केवळ टाळ्या वाजवणारे, वेडेवाकडे नाचणारे, किळसवाणे असेच चित्र दिसते. आपल्या शरीरानुसार ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ हा आपला धर्म ठरतो आणि आपण त्यानुसार आयुष्यभर आपली वाटचाल करत राहतो. मग ज्या मुलांचे शरीर या दोन्हीपैकी कुठल्याही एका धर्मात न बसता तिसऱ्याच अवस्थेत अडकते तेव्हा त्यांचे काय होते? यावर कोणीही विचार क रत नाही. शिरूर येथे व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. संतोष पोटे यांनी अशा कित्येक मुलांचे दु:ख अनुभवले होते. याच अनुभवाच्या आधारे तृतीयपंथी किंवा समलिंगी होण्याची सुरुवात नेमकी कधी आणि कशी होत़े, पालकांनी या मुलांशी कसे वागले पाहिजे, हा विषय त्यांनी निर्माते म्हणून ‘कोती’ या चित्रपटातून मांडला आहे.

‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जे तीन मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत त्यात सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ या चित्रपटाचा समावेश आहे. तृतीयपंथी किंवा समलिंगींचे जे जीवन आपल्यासमोर येते ते व्यथित करणारे, कित्येकदा किळसवाणे असे असते. त्यामुळे त्यांना स्वीकारण्यापेक्षा आपण त्यांच्यापासून सातत्याने दूर जातो. मात्र त्यांच्या या जगण्याची मुळे ही त्यांच्यात शारीरिक बदल होत असताना त्यांना समजावून न घेता त्यांना दूर टाकण्यामध्ये दडलेली आहेत, असे मत डॉ. संतोष पोटे मांडतात. प्रत्येक मुलात साधारणत: सातवीनंतर आणि दहावीपर्यंतच्या काळात वेगवेगळ्या स्वरूपाचे शारीरिक बदल होत असतात. यावेळी संप्रेरकांच्या असंतुलनामुळे कित्येकदा पुरुषाच्या शरीरात अडकलेले स्त्रीमन किंवा त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते. असे बदल पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना समजून घेण्याची गरज असते, मात्र समाजाच्या भीतीने अशा मुलांना सोडून दिले जाते. अशा कित्येक सोडलेल्या मुलांची परिस्थिती डॉक्टर म्हणून आपण जवळून अनुभवली असल्याचे त्यांनी सांगितले.

तृतीयपंथी मुलांना त्यांच्या तथाकथित पारंपरिक गुरूकडे सोडले जाते. हे गुरू या मुलाचे जीवन ही आपली जबाबदारी असून पालकांचा त्यांच्यावर हक्क राहणार नाही, अशाप्रकारचे बाँड लिहून घेतात. एकदा गुरूकडे गेल्यानंतर शिक्षणापासून ही मुले वंचित होतात आणि मग पारंपरिक पद्धतीने त्यांचे लिंगबदल केले जाते, त्यांच्यावर तसेच संस्कार केले जात असल्याने तृतीयपंथीयांच्या समाजात राहून जगण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. हे न करता मतिमंद मूल जन्माला आल्यावर पालक त्याला स्वीकारतातच, त्याच पद्धतीने अशा मुलांचे वास्तवही त्यांनी स्वीकारले आणि या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभ केले, तर अनेक समस्या सुटू शकतील, अशी आशा पोटे यांनी व्यक्त केली. ‘कोती’मध्ये हेच वास्तव मांडले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पोटे यांनी सांगितले.