कमाल आर खानचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. आता केआरकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतरल ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्याने हिंदू मुस्लिमांवर निशाणा साधला आहे.

‘जेव्हा कधी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष होतो हिंदू मुस्लीम हे नेहमी पॅलेस्टाईन लोकांचे समर्थन करतात. पण आता तालिबानी जेव्हा अफगाणिस्तानातील मुस्लिमांना मारत आहे तेव्हा त्याचा विरोध का केला जात नाहीय? याचा अर्थ या जगात जे काही होत आहे ते सगळं आपल्या बांधवांसाठी नाही तर केवळ राजकारणासाठी केले जात आहे’ या आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा: तालिबानी दहशतवादी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. रविवारी त्यांनी काबुलच्या राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेश केला. प्रेसिडेंशियल पॅलेसवर ताबा मिळवल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ विविध माध्यमांनी समोर आणले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला होता. अफगाणिस्तानातील अनेक नागरिक देखील सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे. काही विमानाला लटकून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही कुटुंबीयांसोबत घरात लपून बसले आहेत.