वर्षाच्या सुरूवातीला खान आणि खेमू कुटुंबिय विवाह सेलिब्रेशनमध्ये व्यस्त होणार आहेत. गेल्या वर्षभरापासून अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच प्रेमसंबध असून या दोघांनीही आपले नाते आणखी पुढे नेऊन विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कुणाल-सोहा यांचा २५ जानेवारी रोजी विवाह होणार असून हा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीत करण्याचा त्यांचा मानस आहे. केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. सैफ अली खानने करिना कपूरशी निकाह केल्यानंतर लगेचच सोहा अली खान व कुणाल खेमूच्या लग्नाचीही चर्चा रंगली होती.अर्थात बॉलीवूडमधील अनेक कलावंतांच्या लग्नाची चर्चा अधूनमधून होतच असते. परंतु, सोहा अली खानची आई शर्मिला टागोरने खारच्या उच्चभ्रू परिसरात ९ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी करून कन्या सोहाला भेट दिल्यामुळे सोहा-कुणालच्या लग्नाची चर्चा अधिकच रंगली. अखेर दोघांचाही विवाह होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.