हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाचे जगभरामध्ये अनेक चाहते आहेत. त्यामुळे तिच्याविषयीची प्रत्येक चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसते. काही दिवसापूर्वी ती एका स्टेज परफॉर्मन्स करताना घसरुन पडली होती. तिचा हा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या चर्चा तिने केलेल्या संस्कृत ट्विटमुळे होत आहेत.

लेडी गागाने नुकतंच ट्विटरवर एक संस्कृत श्लोक शेअर केला आहे.तिने हा श्लोक शेअर करुन अनेक भारतीयांची मन जिंकली आहेत. लेडी गागाने ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु’ हा संस्कृत श्लोक पोस्ट केला. याचा मराठी अर्थ, ‘जगातील सर्व लोक सर्व प्रकारे आनंदी राहो’ असा होतो.

दरम्यान, तिने हा श्लोक नक्की का शेअर केला असावा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर अनेक चाहते खूशदेखील झाले आहेत. या ट्विटला १९९.९ हजार लाईक्स आले आहेत. तर ३१.५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे.