गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्याच्या कौटुंबीक सूत्रांकडून देण्यात आली.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्या औषधोपचांराना योग्य प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांची पुतणी रचना यांनी दिली. सध्या आम्ही त्यांची प्रकृती उत्तम होण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच रुग्णालयातून सुट्टी घेण्याचा विचार केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

लता मंगेशकर यांची प्रकृती पूर्णपणे ठिक होण्यासाठी बराच कलावाधी लागू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. अशातच त्यांना पुढील काही दिवस रूग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेजसही व्हायरल झाले. गानसम्राज्ञी लतादीदींनी २८ सप्टेंबर रोजी ९०वा वाढदिवस साजरा केला. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत ३६ भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत.