चरित्रपटांची किंवा वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांची आपली एक स्वतंत्र मांडणी असते. अशा कथांमधील नायक नेहमीच इतरांपेक्षा वेगळा उठून दिसणारा, ‘हिरो’ या लेबलमध्ये चपखल बसणारा असा असतो, असं नाही. कधीकधी सर्वसामान्य तरूण-तरूणी आपल्या एका कृतीने असामान्य असं काही करून जाते आणि मग तिची कथा ऐकताना आपोआपच त्या घटनेचं, त्या व्यक्तीच्या शौर्याचं, कर्तृत्वाचं कौतूक, आदर आपल्या मनात झिरपत राहतो. ‘अल पॅम’ या खासगी हवाई कं पनीच्या फ्रँकफु र्टला निघालेल्या विमानाची हेड पर्सर म्हणून फ्लाईट सांभाळणाऱ्या नीरजा भानोत या तरूणीचा जीवनप्रवास त्याच फ्लाईटबरोबर संपला. एका फ्लाईटमध्ये घडलेली तिच्या जीवनाची अखेर देशाला ललामभूत ठरली. ‘नीरजा’ हा चित्रपट पाहताना दिग्दर्शकाने केवळ हसऱ्या, खेळकर नीरजाची मांडलेली प्रामाणिक कथा आपल्या डोळ्यात पाणी आणते.

‘नीरजा’ हा चरित्रपट आहे हे प्रेक्षकांनाही पहिल्या फ्रेमपासून माहिती असतं. मूळची चंदीगढची आणि वडिलांच्या पत्राकरितेमुळे मुंबईत लहानाची मोठी झालेली नीरजा ही इतर सर्वसामान्य घरात वाढलेल्या तरूणींसारखीच होती. मॉडेलिंगची आवड असलेल्या नीरजाचे पहिले लग्न हुंडय़ामुळे फिस्कटले. त्यानंतर हवाईसुंदरी म्हणून प्रशिक्षण घेतलेली नीरजा ‘अल पॅम ७३’ या कंपनीत रुजू झाली. चित्रपटात नीरजा (सोनम कपूर)आपल्याला इतक्याच साधेपणाने भेटते. तिची कथा चित्रपटात या फ्लाईटसाठी निघण्यापासून ते तिच्या मृत्यूनंतरचे एक वर्ष इतपर्यंतचा प्रवास मांडते. कराची विमानतळावर अतिरेक्यांनी विमान हायजॅक केल्यानंतर आपल्या अनुभवाच्या जोरावर पायलट्सना त्याची माहिती देऊन तिथून पळून जायला मदत करण्यापासून तिने अतिरेक्यांचे एकेक बेत हाणून पाडले. नीरजाने हुशारीने हेड पर्सर म्हणून निर्णय घेत जे प्रयत्न करते त्यामुळे १७ तास विमान हायजॅक करूनही अतिरेक्यांना इस्त्रायलला विमान पळवून नेऊन स्फोट घडवून आणण्याची आपली योजना यशस्वी करता आली नाही. अखेर इतर प्रवाशांना बाहेर काढून तीन लहानग्यांना बंदुकीच्या गोळ्यांपासून वाचवताना नीरजाने आपला जीव गमावला. दिग्दर्शक म्हणून राम माधवानी यांनी एका फ्लाईटमध्ये घडलेली ही कथा रंगवताना नीरजाच्या आयुष्याची संपूर्ण झलक, तिचे व्यक्तिमत्व खुबीने उलगडून दाखवले आहे.

नीरजाचा पहिला विवाह, तिची मॉडेलिंगची इच्छा, राजेश खन्नाचे वेड या सगळ्या गोष्टींसाठी दिग्दर्शक अजिबात फ्लॅशबॅक तंत्राचा आधार घेत नाही. १७ तासांच्या त्या थरारक अनुभवातून जात असताना नीरजाच्या डोळ्यासमोरून सरकणारी एकेक घटना आपल्याला तिच्या अतंरंगात घेऊन जाते. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून नीरजाशी जोडला गेलेला प्रेक्षक शेवटपर्यंत तिच्याशी जोडलेला राहतो. अत्यंत साधी पण मनाला भिडणारी अशी मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. नीरजाच्या मृत्यूनंतर तिच्या आईच्या (शबाना आझमी) भावनेतून दिग्दर्शकाने पुन्हा एकदा या घटनेशी प्रेक्षकांना जोडून घेतले आहे. आपली मुलगी आपण हकनाक गमावली आहे हे तिच्या आईच्या मनातील शल्य, आपण तिला पांढरपेशा समाजाच्या पध्दतीने संकट आले की आपला जीव पहिल्यांदा वाचवण्याचे बाळकडू लहानपणापासून पाजले तरीही आपली मुलगी असं काही करून गेली, तिने इतर प्रवाशांसाठी आपला जीव कसा दिला, हा तिच्या आईला छळणारा प्रश्न, एका आईची खरी भावना लपवलेली नाही. नीरजा ‘हिरो’ म्हणूनच जन्माला आली होती.. असे काही ठोकताळे बांधून चित्रपट रचण्यापेक्षा आहे ते कमीतकमी संवाद, प्रभावी चित्रणातून दिग्दर्शकाने मांडले असल्यानेच की काय नीरजाची कथा आपल्याला सुन्न करून टाकते. कलाकारांची निवड ही चित्रपटाची यशस्वी बाजू आहे. सोनम कपूरचा जन्म जणू या भूमिकेसाठीच झाला असावा इतक्या सहजतेने ती नीरजाच्या व्यक्तिरेखेत फिट झाली आहे. आईची ‘लाडो’, बाबांची ‘बहादूर बेटी’ ही विशेषणे सर्वसामान्यपणे जगताना तिला पेलता आली नसतील कदाचित मात्र कर्तव्य बजावत असताना ती ज्या तडफेने या शिकवणूकीवर परिस्थितीशी झुंज देते ती तिची आत्मियता सोनम कपूरच्या देहबोलीत पुरेपूर उतरली आहे. सोनमच्या कारकिर्दीतला हा एक सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. शबाना आझमींनीही तिला उत्तम साथ देत एका आईच्या नजरेतून ही उलाघाल ज्या पध्दतीने व्यक्त केली आहे त्याला तोड नाही. संगीतकार विशाल खुराणा यांनी संगीत दिलेली चित्रपटातील गाणीही खूप छान आणि क थेला उठाव देणारी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि तरल असा अनुभव देणारा हा चित्रपट नीरजा भानोतच्या कथेचा वेगळ्या अर्थाने विचार करायला लावतो.

नीरजा

दिग्दर्शन – राम माधवानी

निर्मिती – अतुल कसबेकर, फॉक्स स्टार स्टुडिओज

कलाकार – सोनम कपूर, शबाना आझमी, योगेंद्र टिकू, शेखर रविजानी

संगीत – विशाल खुराणा